Headlines

कुडाळात दुचाकी गॅरेजला भीषण आग; सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान

कुडाळ : शहरातील कृष्णाई सुपर मार्केटसमोर, सुलभ शौचालयालगत असलेल्या दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजला सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गॅरेजमधील दुरुस्तीचे साहित्य, ऑइल तसेच शेडवरील पत्रे जळून खाक झाली असून, सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
संजय सोमा सावंत (मूळ सोनवडे, रा. पिंगुळी-म्हापसेकर तिठा) यांचे हे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. सोमवार असल्याने गॅरेज बंद होते. सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता गॅरेजमधून धूर व आग दिसून आल्यानंतर नागरिकांनी तत्काळ माहिती दिली. आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच कुडाळ नगरपंचायतीचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. वाहनचालक संजय टेंबुलकर तसेच फायरमन गोट्या कोरगावकर, गजानन पेडणेकर आणि सतीश जाधव यांनी तत्परतेने आग आटोक्यात आणली.
आगीची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, मुख्याधिकारी खंडू पवळ, नगरसेवक मंदार शिरसाट, नगरसेवक अभिषेक गावडे, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्यासह अभय शिरसाट, श्रीराम शिरसाट, अवधूत शिरसाट, बंड्या शिरसाट, आबा धडाम, सतीश साळगावकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, नुकसानग्रस्त संजय सावंत यांना नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेवक मंदार शिरसाट, नगरसेवक अभिषेक गावडे आणि माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी तत्काळ आर्थिक मदत सुपूर्द केली.

You cannot copy content of this page