Headlines

माठेवाड्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा…

११ जणांवर कारवाई:
रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, चारचाकी व दुचाकी वाहने जप्त; संशयितांविरोधात गुन्हा दाखल..

⚡सावंतवाडी ता.२८-: शहरातील माठेवाडा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सावंतवाडी पोलिसांनी छापा टाकून ११ जणांवर कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य तसेच चारचाकी व दुचाकी वाहने असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. माठेवाडा येथील एका बंगल्यात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी जाऊन छापा टाकला. यावेळी काही व्यक्ती गोलाकार बसून पत्त्यांवर जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम व पत्त्यांची पाने तसेच वाहने ताब्यात घेतली.
जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये लाकडी गोलाकार प्लायवुड टेबल, त्यावर ठेवलेली पत्त्यांची पाने, विविध चलनी नोटा व इतर जुगाराचे साहित्य यांचा समावेश आहे.

या कारवाईत रुपेश संभाजी सावंत (४७, रा. माठेवाडा), गौरव झिलू गावडे (३६, रा. भटवाडी), आकील इक्बाल बाडिवाले (४५, रा. माठेवाडा), पुंडलिक यशवंत सावंत (७२, रा. ओवळीये खालचीवाडी), जेरॉन बाबतीस लॉड्रीक्स (६४, रा. कलंबिस्त मळा), सुनील विष्णू सावंत (५५, रा. सांगेली जायतपेवाडी), संतोष सुमंत राऊळ (४८, रा. सांगेली-मधलीवाडी), संजय वसंत गोंदावळे (५६, रा. माठेवाडा), शंकर शिवा सावंत (३३, रा. कलंबिस्त घनशेवाडी), प्रभाकर हरी कदम (६८, रा. माणगाव-मळावाडी) आणि रामकृष्ण अशोक आडके (४१, रा. कोलगाव-चाफे आळी) यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान संबंधितांकडून जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलीस हवालदार दीपक शिंदे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

You cannot copy content of this page