जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदार संघ हरकती फेटाळल्या

केवळ चार हरकती मान्य

सिंधुदुर्गनगरी ता २४
जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारुप प्रभाग रचनेबाबत प्राप्त झालेल्या ४० हरकती तून ३६ हरकती कोकण आयुक्तानी फेटाळल्या आहेत तर मतदार संघाच्या नावात बदल व वाड्या जोडण्याच्या ४ हरकती मान्य केल्या आहेत. आता अंतिम प्रभाग रचना २७ जूनला जाहीर केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचने बाबत प्राप्त झालेल्या एकुण ४० हरकती मध्ये देवगड तालुक्यातून १२, कणकवली ११, मालवण १०, कुडाळ ६ तर वेंगुर्ला १ अशा हरकतींचा समावेश होता. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वैभववाडी तालुक्यातून एकही हरकत प्राप्त झाली नव्हती. प्राप्त झालेल्या ४० हरकती मधून कणकवली तालुक्यातील नांदगाव जिल्हा परिषद मतदार संघातील ओटव मतदार संघाची नव्याने प्रभाग रचना करण्यात आली होती .त्यात बदल करून ओटव ऐवजी सावडाव पंचायत समिती मतदार संघ करण्यात यावा. ही हरकत मान्य करण्यात आली आहे. मालवण तालुक्यातील गोळवण जिल्हा परिषद मतदार संघाला नागझरवाडी जोडण्याच्या दोन हरकती प्राप्त होत्या या दोन्ही हरकती मान्य करण्यात आल्या आहेत. तर आडवली- मांडली जिल्हा परिषद मतदार संघाला गवळीवाडी जोडण्याची हरकत मान्य करण्यात आली आहे. कोकण आयुक्तांकडे हरकती वर झालेल्या सुनावणीत मान्य करण्यात आलेल्या हरकती वरील निर्णयाचा अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार गटांची संख्या म्हणजे जिल्हा परिषद मतदार संघाची संख्या ५० वरून ५५ वर तर गणांची संख्या म्हणजे पंचायत समिती मतदार संघाची संख्या १०० वरून ११० वर पोचली आहे. या वाढलेल्या गटामुळे पूर्वीच्या गट आणि गणातील काही गावांचा दुसरा गट आणि गणांमध्ये समावेश झाला आहे. काही गट आणि गणांची नावेही बदलली आहेत. त्यामुळे राजकीय गणिते बिघडल्याने या फेरफारावर हरकती घेण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचनेवर मागविण्यात आलेल्या हरकतीवर कोकण आयुक्तांकडे सुनावणी होऊन त्यावर निर्णय झाला आहे.आता २७ जून रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर मतदार संघाची आरक्षण सोडत काढ़ली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

You cannot copy content of this page