९६ उद्योजक व कंपन्यांकडून १ हजार ८४९ रिक्तपदांसाठी होणार प्रक्रिया

सिंधुदुर्ग, दि. २८ (जिमाका) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्यभर मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘रोजगार महाकुंभ–महाराष्ट्र’ अंतर्गत ५०० हून अधिक ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील या रोजगार मेळाव्यांसाठी आतापर्यंत ९६ उद्योजक व कंपन्यांनी १ हजार ८४९ रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. विविध नामांकित कंपन्या व आस्थापनांमार्फत विविध पदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सावंतवाडी येथील टोपीवाला स्मारक तंत्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात ८ कंपन्यांमार्फत १२८ रिक्तपदांसाठी, कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात १५ कंपन्यांमार्फत ३१९ रिक्तपदांसाठी, दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग येथे ९ कंपन्यांमार्फत २०५ रिक्तपदांसाठी, वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील अनगरसिद्ध खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ८ कंपन्यांमार्फत ६० रिक्तपदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ११ कंपन्यांमार्फत ३७८ रिक्तपदांसाठी, कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये ८ कंपन्यांमार्फत ८६ रिक्तपदांसाठी, कणकवली येथील एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ६ कंपन्यांमार्फत १३३ रिक्तपदांसाठी, कुडाळ तालुक्यातील वाडी हुमरमळा (डिगस) येथील श्री. पुष्पसेन सावंत कृषी/फार्मसी/नर्सिंग महाविद्यालयात ३ कंपन्यांमार्फत ३३ रिक्तपदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मालवण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ८ कंपन्यांमार्फत १४७ रिक्तपदांसाठी, देवगड येथील श्री. स. ह. केळकर महाविद्यालयात १० कंपन्यांमार्फत १२४ रिक्तपदांसाठी, वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ प्रक्रिया संशोधन केंद्रात ७ कंपन्यांमार्फत २२४ रिक्तपदांसाठी, तर सावंतवाडी येथील बी.टी.आर.आय. येथे ३ कंपन्यांमार्फत १२ रिक्तपदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्थानिक तरुण-तरुणींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि नोंदणी करून मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभारी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग अमिन इ. तडवी यांनी केले आहे.
रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिंकवर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संबंधित कार्यक्रमस्थळी अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा. कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८८३५ आहे. तसेच कार्यालयाच्या ‘sindhudurgrojgar’ या फेसबुक व इन्स्टाग्राम पेजला भेट द्यावी.
00000
