युवकांनी पोलीस भरती प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेऊन यश मिळवावे – बंडू चव्हाण

⚡मालवण ता.२१-: आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित पोलीस भरती प्रशिक्षण मार्गदर्शन शिबीर हा स्तुत्य उपक्रम असून संस्थेचे संस्थापक अरुण लाड यांनी नेहमीच अशा समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन केले आहे. पोलीस दलात सेवा बजावण्याच्या दृष्टीने पोलीस भरती प्रशिक्षण शिबिराचा युवकांनी लाभ घेऊन यश प्राप्त करावे, असे प्रतिपादन शिवसेनेचे आडवली विभागप्रमुख व असगणीचे माजी उपसरपंच दीपक उर्फ बंडू चव्हाण यांनी येथे बोलताना केले.

आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आडवली येथील आर. ए. यादव हायस्कुल मध्ये पोलीस भरती प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे आडवली विभागप्रमुख बंडू चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी संस्थापक अरुण लाड, आडवली हायस्कुलचे मुख्याध्यापक तुषार सकपाळ, आडवली सरपंच संजय आडवलकर , विठ्ठल घाडी, संजय दहिवाल, श्री परब , तसेच शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरात आडवली, हिवाळे, राठीवडे, पळसंब, पोईप, श्रावण, बागायत आदी भागातील ४२ जणांनी सहभाग घेतला. यात ८ युवतींचाही समावेश होता.

यावेळी अरुण लाड यांनी आधार चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रम राबवत आहे. समाजातील बेरोजगार तसेच पोलीस दलात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवकांना पोलीस भरतीत सहभागी होता यावे या दृष्टीने आवश्यक ते मार्गदर्शन करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांना याचा निश्चित फायदा होईल, असे सांगितले. यावेळी मार्गदर्शक म्हणून लाभलेले मुंबई पोलीस विभागातील अधिकारी संजय दहिवाल, श्री. परब यांनी सहभागी युवकांना पोलीस भरती बाबतच्या विविध गोष्टींबाबत मार्गदर्शन केले. या शिबिराची सांगता उद्या दि.२२ जून रोजी होणार आहे.

फोटो

आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आडवली येथील आर. ए. यादव हायस्कुल मध्ये पोलीस भरती प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिराचे दीपप्रज्वलन करून उदघाटन करताना दीपक चव्हाण सोबत अरुण लाड मुख्याध्यापक तुषार सकपाळ संजय दहिवाल,व इतर

You cannot copy content of this page