पाईपलाईनसाठी खोदलेले चर लवकरात लवकर बुजवावेत

अन्यथा ग्रामस्थांना घेऊन तीव्र आंदोलन छेडू :मनसे आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांचा इशारा

⚡सावंतवाडी ता.२०-: पाईपलाईन साठी खोदलेले चर पावसाचे पाणी जाऊन बसल्याने आरोस गावात विद्या विहार इंग्लिश स्कूल नजीक गाड्यांचे अपघात होत आहेत, या भागातून एसटी वाहतुक करण्यास नकार येत आहे त्यामुळे येथील ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले आहे तरी संबंधित प्रशासनाने याप्रश्नाकडे तात्काळ लक्ष घालावे अन्यथा ग्रामस्थांना घेऊन तीव्र आंदोलन छेडू असा इशारा मनसे आरस विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांनी दिला आहे.

आरोस बाजारपेठेतून पाईपलाईन साठी रस्त्याच्या बाजूने चर खोदण्यात आले आहे सदरची पाईपलाईन टाकून काम पूर्ण झाले तरी ज्या पद्धतीने चर बुजवणे आवश्यक होते त्याकडे संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने आता पावसाळ्यात त्याचा त्रास वाहनचालक तसेच नागरिकांना सहन करावा लागत आहे खोदलेल्या चरात पावसाचे पाणी जाऊन चरातील माती बसल्याने हे चर पुन्हा निर्माण झाले आहेत आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूलच्या नजीक गावठाण कडे जाणाऱ्या रस्त्यावर मधोमध चर पडल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणे कठीण बनले आहे.

चरात गाडी गेल्यावर ती रुतून बसणे आदी प्रकार घडत आहेत, परिणामी या रस्त्यावरून वाहतूक करण्यास वाहन चालक टाळत असून एसटी प्रशासनाकडूनही या भागात जाण्यास नकार येत आहे मुळात सावंतवाडी डेपोतून सुटणाऱ्या एसटीच्या फेऱ्या या भागातून बंद आहेत, बांदा डेपोतून सुटणाऱ्या ठराविक फेऱ्या या भागातून जातात मात्र पडलेल्या चरामुळे त्या फेर्यासुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी गावठाण वाडीतील शालेय विद्यार्थी शेतकरी ग्रामस्थ यांचे मोठे हाल होत आहेत.

मुळात पाईपलाईनचे काम झाल्यानंतर सदरचे चर दगडमाती टाकून बुजवणे गरजेचे होते मात्र तसे न करता केवळ मलमपट्टी करून ठेकेदाराने वेळ मारून नेली आहे त्यामुळे सदरच्या ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी झाल्यात ठेकेदार किंवा संबंधित खाते जबाबदारी घेणार का असा सवाल ग्रामस्थातून उपस्थित होत आहे तरी संबंधित विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावा व वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी अन्यथा मनसेच्या माध्यमातून ग्रामस्थांना घेऊन तीव्र आंदोलन छेडू व त्यास सर्वस्वी जबाबदार संबंधित प्रशासन असेल असा इशारा मनसेचे आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांनी दिला.

You cannot copy content of this page