⚡मालवण ता.१६-: तोंडवळी खालची (तळाशिल) येथे एसटी बस जात नसल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे जागेची त्वरित पाहणी करून एसटी बसफेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी तोंडवळीचे माजी सरपंच आबा कांदळकर यांनी कणकवली आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कणकवली आगाराच्या दोन एसटी बसेस (कणकवली-तोंडवळी) अशा सुरू असून या बसेस वळविण्यास पुरेशी जागा नसल्याचे कारण सांगून कोणतीही पूर्वसूचना प्रवाशांना किंवा स्थानिक प्रशासनास न देता, बस तोंडवळी वाघेश्वर मंदिर येथे थांबते व तेथूनच मागे जाते. ज्या ठिकाणी गाडी थांबते, तेथून पुढे सुमारे ६ किमी दूर गाव असून प्रवाशांना ६ किमी चालत जावे लागते. आजही गाडी तोंडवळी तळाशिल असा बोर्ड लावून येते व तिच्या रुटप्रमाणे शेवटच्या ठिकाणी न जाता अर्ध्यावरून मागे जाते. ही बस तोंडवळी वाघेश्वर मंदिर असा रुट घेऊन येते किंवा कसे? तसेच ज्या बस चालकाने तक्रार दिली आहे, त्याची लेखी प्रत मिळावी. बस पूर्वसूचना न देता अर्ध्यावरून मागे फिरविली जाते हे बेकायदेशीर आहे, असे आबा कांदळकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
