गटार, व्हाळी सफाईचे काम दिखाऊपणाचे; मुख्याधिकाऱ्यांनी कॅटवॉक करत पाहणी करावी-:राजन वराडकर

मालवण ता.०४-:* मालवण नगरपालिकेतर्फे शहरात सुरू असलेल्या गटार व व्हाळी साफसफाईच्या कामाची माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी पाहणी केली पावसाच्या तोंडावर होत असलेले गटार व व्हाळी सफाई ही दिखाऊ पद्धतीची व अर्धवट स्थितीतील असून गटार व व्हाळीमध्ये चिखल व कचऱ्याचे साम्राज्य जैसे थे असल्याचा आरोप वराडकर – कुशे द्वयी यांनी करून मालवणच्या पर्यटन महोत्सवात ज्या पद्धतीने मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी कॅटवॉक केला तसाच कॅटवॉक पूर्ण शहरात करून गटार सफाई कामाची व इतर समस्यांची पाहणी करावी अशी मागणी केली आहे दरम्यान, मालवणात प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या गटार व्हाळी सफाई कामाची चौकशी करून या कामाचे कोणतेही बिल ठेकेदारास अदा करण्यात येऊ नये अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण करणार असल्याची माहितीही श्री वराडकर यांनी पत्रकारांना दिली पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात सध्या नगरपालिका प्रशासनाकडून गटार व व्हाळी सफाईचे काम सुरू आहे.

माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या समवेत मालवण शहरातील अनेक भागात फिरून या कामाची सद्यस्थिती पत्रकारांसमोर मांडली. काही गटार व व्हाळी यांची सफाई ही अर्धवट केली असून केवळ वरवरचा कचरा काढण्याचे केले गेले आहे.

त्यामधील माती व कचरायुक्त गाळ तसाच ठेवण्यात आला आहे. तर काही महत्वाच्या व्हाळीची सफाईच झालेली नाही. जून महिना उजडला असताना आणि पावसाळा तोंडावर असताना होत असलेले गटार सफाईचे काम दिखाऊपणाचे आहे. अशा कामामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होणार कसा ? असा सवाल वराडकर यांनी उपस्थित केला. मेढा भागातही दोनपिंपळ मार्ग, चिवला बिच, मेढा, राजकोट याठिकाणी तर गटार खोदाई झालीच नसल्याचे यावेळी गणेश कुशे यांनी सांगितले. या कामाच्या टेंडर मधील कराराप्रमाणे काम झालेले दिसत नाही. पूर्ण शहराचे काम झाल्याशिवाय ठेकेदारास बिल देण्यात येऊ नये. नगरपालिका प्रशासनानाने ‘हम करे सो कायदा’ हा प्रकार आता थांबवावा नाहीतर एक दिवस जनताच रस्त्यावर उतरेल असा इशारा वराडकर यांनी दिला .

आपली बांधीलकी जनतेशी असल्याने मुख्याधिकाऱ्यांशी आपला वैयक्तिक वाद नाही तर जनहीताची कामे होत नाही म्हणून त्या पदाशी आणि त्या खुर्चीशी वाद आहे. जनतेचे पैसे वाया जात असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा वराडकर यांनी दिला. मालवण शहरात कचरा समस्याही गंभीर बनत चालली आहे. कचरा वेळेत उचलला जात नाही. कचऱ्याचे ढीग अनेक भागात दिसून येतात. घरोघरी उचलला जाणारा कचराही ठप्प आहे. डम्पिंग ग्राउंड ठिकाणी शहरातून सक्शन करून आणला जाणारा मैल ज्या ठिकाणी टाकला जातो त्या ठिकाणाहून तो वाहत रस्त्यावर येतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे, कचरा प्रश्नाबाबत नगरपालिकेवर जनहित याचिका दाखल करावी लागेल, असेही वराडकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page