Headlines

कणकवली तालुक्यात ५ व ६ ऑगस्टला पाणी व अन्नपदार्थ तपासणी शिबिर

व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांना सहभागी होण्याचे आवाहन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हा हॉटेल व्यावसायिक संघटना आणि कणकवली तालुका व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ५ व ६ ऑगस्ट २०२६ रोजी कणकवली तालुक्यात पाणी व अन्नपदार्थ तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. व्यापारी, उद्योग, हॉटेल व्यावसायिक तसेच अन्न व खाद्यपदार्थाशी संबंधित सर्व व्यावसायिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अन्नसुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या शिबिरात पिण्याच्या पाण्याची तसेच विविध अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येणार आहे.

५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत खारेपाटण, सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत तळेरे (रिक्षा स्टँड), दुपारी २ ते ३ या वेळेत नांदगाव आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत कणकवली शहरातील ए.पी.सी.एल. हॉल (कणकवली कॉलेज) येथे तपासणीसाठी नमुने स्वीकारले जाणार आहेत. तसेच ६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत फोंडा बाजारपेठ येथे नमुने जमा करता येणार आहेत.

तपासणीसाठी स्वच्छ नवीन बाटलीत १ लिटर पिण्याच्या पाण्याचा नमुना तसेच सुरक्षित पॅकिंगमध्ये किमान २५० ग्रॅम अन्नपदार्थाचा नमुना आणणे आवश्यक आहे. पाणी तपासणीसाठी ₹२,३००, तर अन्नपदार्थ तपासणीसाठी प्रति पदार्थ ₹१,००० शुल्क निश्चित करण्यात आले असून किमान दोन अन्नपदार्थांची तपासणी करणे बंधनकारक आहे. सर्व शुल्क रोख स्वरूपात स्वीकारले जाणार आहे.

या उपक्रमासाठी Aqua Laboratories India (OPC) Pvt. Ltd. तसेच FSSAI व NABL मान्यताप्राप्त Anushka Food & Water Testing Laboratories, पुणे यांचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे. “शुद्ध पाणी आणि सुरक्षित अन्न, निरोगी जीवनाची हमी” हा संदेश देत व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि संबंधितांनी या तपासणी शिबिरात सहभागी होऊन अन्न व पाण्याच्या गुणवत्तेची खात्री करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page