Headlines

मुलींच्या शिक्षणाला रोटरी क्लबचा हातभार

२० विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण

कणकवली : ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी तसेच शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी त्यांचा प्रवास सुलभ व्हावा, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या वतीने आणि आयपीडीजी (IPDG) रो. अरुण भंडारे यांनी उपलब्ध करून दिलेल्या डिस्ट्रिक्ट ग्रँटमधून २० विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.

गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाचा पाया अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. सायकल उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थिनींना शाळेत नियमित उपस्थित राहणे सोपे होणार असून त्यांच्या शिक्षणातील अडथळे कमी होण्यास मदत होणार आहे. शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणारे असे सामाजिक उपक्रम काळाची गरज असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचे अध्यक्ष रो. दीपक आळवे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. प्रणय तेली, चार्टर प्रेसिडेंट डॉ. प्रशांत कोलते, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक, सेक्रेटरी रो. म्हाडदळकर, आयपीपी रो. राजीव पवार, रो. ललित वंजारे, रो. व्यंकटेश घोगळे, रो. गौरव घोगळे, रो. विवेक राणे, आयपीपी रो. अरुण मालणकर, ओसरगावचे उपसरपंच गुरुदास सावंत, ग्रामपंचायत सदस्या वंदना पारकर, सामाजिक कार्यकर्ते बबली राणे, ग्रामस्थ तसेच लाभार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव करण्यात आला. शिक्षण, आरोग्य आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांद्वारे रोटरी क्लब पुढील काळातही समाजसेवेचे कार्य सातत्याने सुरू ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

You cannot copy content of this page