Headlines

आरोग्य सेवेचा बोजवारा; जिल्ह्यातील रुग्ण वाऱ्यावर…

कुणाल किनळेकर:शिबिरांचा गाजावाजा, पण नियमित आरोग्य सेवा कोलमडली..

⚡कुडाळ ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी आरोग्य व्यवस्था गंभीर अवस्थेत असून जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज तसेच कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयातील अनेक मूलभूत समस्या अद्याप कायम आहेत. अशा परिस्थितीत नव्या आरोग्य उपकेंद्रांचे उद्घाटन आणि घोषणांचा गाजावाजा करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर हे आरोग्य उपकेंद्रांचे उद्घाटन व नव्या केंद्रांच्या घोषणांमध्ये व्यस्त असताना प्रत्यक्षात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा “आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय” अशा अवस्थेत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार अमावस्या आणि पौर्णिमेला मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरे घेऊन प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा नियमित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, अशी मागणी किनळेकर यांनी केली.
खाजगी रुग्णालय आणि खाजगी डॉक्टर यांच्या लॉबीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य परिस्थिती बिकट आहे. सिंधुदुर्गातील सरकारी रुग्णालयांमधून मोठ्या प्रमाणावर रुग्णांना गोव्यातील बांबोळी रुग्णालयात पाठविले जाते. दरमहा किती रुग्ण रेफर केले जातात आणि सर्वच रुग्णांना बाहेर पाठविण्याची आवश्यकता असते का, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीतज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत, सोनोग्राफी मशीन बंद आहे, अनेक ठिकाणी वैद्यकीय उपकरणे असूनही तंत्रज्ञांची कमतरता आहे, तर काही तज्ज्ञ डॉक्टर नियमित ओपीडीमध्ये अनुपस्थित राहून खासगी रुग्णालयांमध्ये सेवा देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील काही वॉर्ड डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे बंद ठेवण्याची वेळ आल्याचा दावा त्यांनी केला.
या सर्व परिस्थितीमुळे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना उपचारांसाठी गोवा, कोल्हापूर किंवा मुंबईचा आधार घ्यावा लागत असून ही सिंधुदुर्गसाठी शोकांतिका असल्याचे किनळेकर म्हणाले. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या या बिकट अवस्थेला स्थानिक आमदार, खासदार आणि पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
You cannot copy content of this page