यशवंत माधव यांचा इशारा : अधिकाऱ्यांना मिळणार जशासतसे उत्तर
बांदा ता.०३-:* मडुरा गावातील वीज समस्यांसंदर्भात अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष होत आहे. समस्या दूर करणे सोडाच पण गेलेली वीज किती दिवसांत परत येईल याची खात्री देणारा एकही अधिकारी नाही. मात्र उडवाउडवीची उत्तरे देणारे कर्मचारी व अधिकारी आहेत. येत्या पंधरा दिवसांत गावातील सर्व वीज समस्या मार्गी न लावल्यास संपूर्ण गाव मडुरा येथेच उपोषणास बसणार असल्याचा इशारा सातार्डा भाजपा शक्ती केंद्रप्रमुख यशवंत माधव यांनी महावितरण कुडाळ अधीक्षक अभियंता यांना दिला आहे. वीज वितरणमध्ये बांदा परिसरात एकही सक्षम असा अधिकारी किंवा वायरमन नाही.
भरमसाट आलेली वाढीव बिले वसूल करणारे अधिकारी बरेच आहेत, परंतु वीज समस्या मार्गी लावणारा अधिकारी बांदा दशक्रोशीतील नाही याची खंत वाटते. मडुरा गावामध्ये असणाऱ्या डीपींना दरवाजे नाहीत काही डीपी तर जीर्णावस्थेत झाले आहेत. विद्युत वाहिन्या कमजोर होऊन त्या अचानक खाली पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डिगवाडी ते मंगळमोड मार्गे कास येथे जंगलातून जाणारी लाईन खूप जुनाट असून संपूर्ण लाईन बदलण्यास निवेदनाद्वारे मागणी केली होती.
परंतु त्याचे उत्तरही महावितरण जवळ नसल्याने ही ग्राहकांची चेष्टा केल्यासारखे आहे, असे यशवंत माधव यांनी सांगितले. रोणापाल मंदिर ते माऊली मंदिर मडुरा मेन लाईन जोडण्याची मागणी केली असता त्याचाही विचार केला जात नाही. अशा बऱ्याचशा समस्यांना वीजग्राहकांना तोंड द्यावे लागत आहे.
वारंवार अधिकाऱ्यांना सांगून याकडे लक्ष न देता फक्त उडवाउडवीची उत्तरे देण्यास अधिकारी धन्यता मानतात. त्यामुळे कोणतीही सबब न सांगता येत्या पंधरा दिवसांत अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करून वीज समस्या मार्गी लावावी अन्यथा संपूर्ण गाव याच ठिकाणी उपोषणास बसणार असल्याचा लेखी इशारा सातार्डा भाजपा शक्ती केंद्रप्रमुख यशवंत माधव यांनी वीज वितरणला दिला आहे.
