टोल वसुलीला व्यापारी संघाचा विरोध

नितीन गडकरी यांनी “तो” शब्द पाळावा;जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांची मागणी

मालवण (प्रतिनिधी) मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या निमित्ताने कुडाळ येथे आयोजित सभेत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग शासन निर्मित असल्याने पथकर मुक्त राहील असे घोषित केले होते. मात्र आता पथकर वसुली सुरू होत असून या पथकर वसुलीस सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचा विरोध असून गडकरी यांनी दिलेला शब्द पाळून सिंधुदुर्ग वासीयांना पथकरापासून मुक्तता द्यावी, अशी मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या रा.म.मार्ग क्र.६६च्या झाराप ते खारेपाटण पर्यंतच्या टप्प्याची पुनर्निर्मिती जवळपास ९७% पुर्ण झाल्याने आपल्या खात्या मार्फत ठेकेदार नियुक्त करून पथकर वसुलीची यंत्रणा १ जून २०२२ पासून कार्यान्वित होत असल्याचे समजत आहे.

पथकरातून महामार्गाचा खर्च वसूल करण्यासही हरकत नाही; मात्र या सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाची जागा आणि जिल्ह्याचा नकाशा लक्षात घेतला तर जिल्ह्याच्या उत्तर भागातील देवगड,वैभववाडी आणि कणकवली या तीन तालुक्यांतील नागरिकांना जिल्हा मुख्यालय गाठण्यास पर्यायी सोयीस्कर मार्गच नसल्याने पथकराने अधिकचा भुर्दंड पडणार आहे. त्याच बरोबर कोल्हापूर नंतरची कणकवली बाजारपेठ हीच जिल्ह्याच्या घाऊक किराणा व्यापाराची मुख्य बाजारपेठ असल्याने उर्वरीत दक्षिण सिंधुदुर्गातील नागरिकांना या पथकरा मुळे अधिकच्या महागाईला तोंड द्यावे लागणार आहे, असे प्रसाद पारकर यांनी म्हटले आहे. तसेच जिल्ह्यातंर्गत उत्तर-दक्षिण रहदारी साठी अन्य पथकर मुक्त असा पर्यायी मार्गच उपलब्ध नाही. जो मार्ग एन एच १७ च्या रूपाने उपलब्ध होता त्याचेच रूपांतर आता या पथकर युक्त चौपदरी एनएच ६६ मध्ये केला आहे.

नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने व कल्याणकारी राज्याच्या संकल्पने नुसार नागरिकांना किमान पायाभूत सुविधा पुरविणे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. मात्र या संकल्पनेलाच छेद देत सिंधुदुर्गवासीयांच्या जिल्हातर्गत संपर्का साठी मुळातच अस्तित्वात असलेल्या हक्काच्या पथकर मुक्त एनएच १७ ची सुविधा काढून घेऊन त्या बदल्यात पथकराचा भुर्दंड देणारा चौपदरी महामार्ग जबरदस्तीने वापरण्यास भाग पाडणे कोणत्याही दृष्टीने योग्य ठरत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहिररित्या दिलेला शब्द पाळत निदान सिंधुदुर्गातील रहिवाश्यांना नियोजित पथकरा पासून मुक्तता द्यावी. अन्यथा जिल्ह्याचा उत्तर दक्षिण दुवा साधणारा आमचा पुर्वी पथकर मुक्त मार्ग आम्हाला परत करावा अशी मागणी प्रसाद पारकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page