येणारी जिल्हा परिषद नारायण राणे यांचीच असेल

फोंडाघाट ग्रामपंचायत भवनचे आम. नितेश राणे यांच्याहस्ते लोकार्पण

कणकवली ता.०१-:* विरोधक शिवसेनानेते टोल नको म्हणून आंदोलन करतात. त्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आधिच स्थगिती दिली. उद्या सेनेवाले नवीन गाड्यांमधून फिरताना दिसतील त्यावेळी समजावे टोल आंदोलन यशस्वी झाले.त्यामुळे विकासकामे व विकास करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.येणारी जिल्हा परिषद नारायण राणे यांची असेल, त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊया असे आवाहन आम. नितेश राणे यांनी केले. फोंडाघाट ग्रामपंचायत भवनाच्या लोकार्पण सोहळ्यात आमदार नितेश राणे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी जि.प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत ,सरपंच संतोष आग्रे,उपसरपंच सुदेश लाड, सभापती मनोज रावराणे, सुरेश सामंत,तुळशीदास रावराणे, राजन चिके, भाई भालेकर,बबन हळदिवे, विश्वनाथ जाधव, नांदगाव- वाघेरी- लोरे -घोणसरी चे विद्यमान सरपंच,नीलिमा प्रभुदेसाई,ग्रामपंचायत सदस्य, प्रशासकीय अधिकारी इत्यादी उपस्थित होते.

आम.नितेश राणे म्हणाले,ग्रामपंचायतीच्या १९४१ साली निर्मितीपासून आज २०२२ पर्यंतचा इतिहास पाहताना, त्या निमित्ताने गावच्या भविषष्यावरही चर्चा झाली पाहिजे. फोंडाघाट चा विकास तेवढ्याच गतीने झाला पाहिजे .आणि आजच्या पिढीला त्याच्या भावी २५ वर्षानंतर परिवर्तन पाहावयास मिळाले पाहिजे. त्यासाठी नव्या वास्तूमध्ये प्रयोगशील संकल्पना राबविल्या पाहिजेत.अभ्यास दौरे करून फोंडाघाटच्या विकासाचा प्रस्ताव केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेसाहेब यांचेकडे दिल्यास, ४०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कोकम आणि कोकणी मेव्यातून आर्थिक समृद्धी येईल.

औद्योगिकतेच्या माध्यमातून इतिहास बदलून हाताला काम मिळेल.असा विश्वास भाजपा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. आपला विकास कोण करेल, कोणाच्या मागे खंबीर उभे राहावे याची जाणीव ज्यावेळी फोंडाघाटवासियांना होईल तेव्हा विकासाची परिभाषा बदलेल आणि विकासाची गंगा आपोआप प्रवाही होईल. त्यासाठी आमचं काय चुकतं, याच्या विचारमंथनासाठी मी केव्हाही तयार आहे. प्रेम- आपुलकी राणेकुटुंबीयांची फोंडाघाट वर आहेच. त्यामुळे विकास कामात मी कधीही कमी पडणार नाही असा शब्द आमदार नितेश राणे यांनी दिला.

फोंडाघाट बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरण अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. रस्ता हे आर्थिक विकासाकडे नेणारे व दळणवळण सुलभ करणारे असल्याने काळाची गरज ठरणार आहे. त्यासाठी बाजारपेठेतील लोकांनी एकत्र येऊन माझ्यावरील राग काढून टाकावा.तसेच डाव्या कालव्याचा प्रश्न आता माझ्या अखत्यारीत असल्याने तो मी सोडणार अशी ग्वाही दिली. त्यासाठी येथील लोकांनी दृष्टीकोन बदलावा. ठाकरे सरकारने कोकणासाठी केलेल्या चार गोष्टी सांगाव्यात ? अर्थमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिले ६२ कोटी रुपये परत दिले नाहीत. विज बिल न दिल्याने रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत.

गाव अंधारात लोटण्याचे काम ठाकरे सरकारने केले आहे. खड्डे बुजविण्यासाठी निधी नाही.असे आम.राणे म्हणाले. यावेळी मनोज रावराणे, मोहन पाताडे,सुरेश सामंत,संतोष टक्के यांनी नूतन वास्तूला शुभेच्छा देताना या प्रशासकीय इमारतीत लोकजागृती- प्रबोधन- सहकार्य आणि समाधानाची अपेक्षा व्यक्त केली.अजित नाडकर्णी यांनी सरपंच यांना कार्यतत्परतेचे घड्याळ भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

संदेश तथा गोट्या सावंत यांनी सरपंच यांच्या कार्याचे कौतुक करताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, डम्पिंग ग्राउंड करिता सहकार्याची ग्वाही दिली. सरपंच संतोष आग्रे यांनी स्वप्नपूर्ती झाल्याची भावना व्यक्त करताना आपला अनुभव सांगितला. ताडपत्री ही या सुबक भव्य वास्तूची प्रेरणा असून खचून न जाता हे जिकरीचे काम मी आपणा सर्वांच्या जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे, सौ. सुजाता हळदीवे, गोटया सावंत व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून आणि माझा कार्यकाल पूर्ण होत असताना झाल्याचा आनंद व्यक्त केला. शेवटी आभार बबन हळदिवे यांनी मानले .

You cannot copy content of this page