अभ्यासक सतीश लळीत यांची माहिती
ओरोस ता.०१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर घालणारी आणखी ३५ हून अधिक कातळशिल्पे उजेडात आली आहेत. कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील खोटले (ता. मालवण) गावच्या धनगरवाडी सड्यावर आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे येथे आढळलेले ‘लज्जागौरी’सदृश कातळशिल्प आश्चर्यकारक असून आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे, अशी शक्यता आहे.
मात्र या सर्व कातळशिल्पांचे अस्तित्व या परिसरातील चिरेखाणींमुळे धोक्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून अनेक कातळशिल्पे चिरेखाणींमध्ये नष्टही झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती या कातळशिल्पांचा शोध लावणारे अभ्यासक व ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली.
