मालवण ता.३१-:* टोल वसुली बंद पाडण्यासाठी मच्छीमार संघटना एकत्र येऊन काम करणार आहेत. टोल बाबत राजकीय पक्षांनी नौटंकी थांबाबवी. टोल आंदोलनाचे नेतृत्व मच्छीमार करणार असून मच्छी वाहतूक करणाऱ्या गाड्यांना टोल आकारून दाखवा असे आव्हान नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. व्यवसाय करणारा मग तो कृषि, मत्स्य, वाहतूक, व्यापारी, पर्यटन अथवा कुक्कुटपालन व्यवसाय करणारा असेल, आधीच मेटाकुटीला आला आहे.
आता त्यात भर म्हणून हे टोलचे संकट आले आहे. हे टोल संकट नसून प्रतिथयश सर्वपक्षीय राजकारणी आणि टोल कंत्राटदार यांनी मिळून कोकणातील जनतेला लुटण्यासाठी आखलेला पूर्व नियोजित प्लॅन आहे. महामार्ग बांधणीच्या वेळी कंत्राटदार आणि राजकीय पुढारी यांच्या दिले घेतलेल्या उपकारांची परतफेड जनतेच्या पैशातून करण्यासाठी ही टोल धाड आहे. ही टोळ धाड बंद करण्यासाठी कोल्हापूर स्टाईलने आंदोलन करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे कोल्हापूर मध्ये टोल वसुली बंद पाडली, त्याचप्रमाणे मच्छीमार संघटना एकत्र येऊन काम करणार आहेत. त्याप्रमाणे संघटने मध्ये चर्चा सुरू असून लवकरच या संदर्भात जिल्ह्यातील सर्व संघटनाच्या बैठकीचे नियोजन करण्यात येणार आहे. टोल माफ़ी संदर्भातील शासनस्तरावर झालेला पत्रव्यवहार राजकिय पक्षाच्या प्रतिनिधींनी जाहीर करावा, असे आवाहन रविकिरण तोरसकर यांनी केले आहे.
