सिंधुदुर्गच्या पर्यटन बाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी व्हॉटसॲप नंबर व हेल्पलाईन नंबरची व्यवस्था करा…

जिल्हा व्यापारी संघाचे कार्यवाह नितीन वाळके यांची निवेदनाद्वारे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी…

मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्गातील पर्यटनाबद्दल पर्यटकांना बरा-वाईट अभिप्राय नोंदविण्यासाठी राज्य पर्यटन विभागामार्फत एक स्वतंत्र व्हॉट्सअॅप क्रमांक व हेल्पलाईन नंबरची व्यवस्था करावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पाठविले आहे. निवेदनात वाळके यांनी म्हटले आहे,

मालवणच्या पर्यटन व्यवसायाला काळीमा फासणाऱ्या दुर्घटनेत दोन पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. या भीषण अपघातानंतर इथे पर्यटनासाठी येऊन गेलेले अनेक पर्यटक इथल्या काही पर्यटन व्यावसायिकांकडून मिळत असलेल्या गैरवर्तणुकीबाबतचे आपले अनुभव समाजमाध्यमांद्वारे मांडत असतानाच आपण हे आधीच मांडले. असते, तर निदान कालची दुर्घटना टळली असती, अशा भावना व्यक्त करत आहेत. आज किनारी तालुक्यांचे अर्थकारण पर्यटनकेंद्री झालेले आहे. ही बाब लक्षात घेता, एखाद्या व्यावसायिकाकडून घडलेली अशा प्रकारची गैरवर्तणूक ही निर्माण होत असलेल्या सर्व व्यवस्थेवर दीर्घकालीन दुष्परिणाम घडवू शकते. ही बाब लक्षात घेऊन पर्यटकांना इथल्या पर्यटनाबद्दलचा आपला बरा वाईट अनुभव तात्काळ सुयोग्य यंत्रणेकडे नोंदविता येण्यासाठी राज्य पर्यटन विभागामार्फत एक स्वतंत्र व्हॉटसअॅप क्रमांक /हेल्पलाईन नंबरची व्यवस्था निर्माण झाल्यास आणि त्याची व्यापक प्रसिद्धी केल्यास येणारे पर्यटक सुरक्षित मानसिक अवस्थेत इथल्या पर्यटनाचा आनंद लुटू शकतील आणि इथल्या पर्यटन व्यावसायिकांवरही पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी निश्चित सतत दडपण राहील.

You cannot copy content of this page