शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची टीका…
मालवण (प्रतिनिधी) निधी मंजुरीचे केवळ पत्र आणले म्हणून विकासकाम होत नाही. निविदा प्रक्रिया नसताना, कार्यारंभ आदेश नसताना देवबागवासियांची दिशाभूल करण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी आपले अज्ञानपण दाखवत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याहस्ते बंधाऱ्याचे भूमीपूजन करण्याचा घाट घातला. स्वतः खासदार असतांना निलेश राणे यांनी जनतेसाठी केंद्रातून किती निधी आणला. नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था निलेश राणे यांची झाली आहे, अशी टीका शिवसेना मालवण तालुकाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी पत्रकार परीषदेत केली.
देवबाग बंधाऱ्याच्या कामावरून शिवसेना व भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असून भाजपकडून घालण्यात येत असलेल्या बंधाऱ्याचे बांधकाम रोखण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला होता. या आरोपाचा समाचार हरी खोबरेकर यांनी शिवसेना मालवण तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत घेतला. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, मंदार ओरसकर, प्रसाद आडवणकर, मोहन मराळ, दत्ता पोईपकर, नरेश हुले, यशवंत गावकर आदी उपस्थित होते. हरी खोबरेकर म्हणाले, एखाद्या विकासकामासाठी केवळ निधी मंजुरीचे पत्र देऊन चालत नाही. देवबाग बंधाऱ्यासाठी आवश्यक सीआरझेड, व पर्यावरण विषयक अनेक परवानग्या घेणे आवश्यक आहे. यासाठी आम. वैभव नाईक, खासदार विनायक राऊत हे केंद्रीय स्तरावर प्रयत्न करत आहेत.
असे असताना निधी मंजुरीचे केवळ पत्र आणायचे, केंद्रीय मंत्र्यांना देवबाग मध्ये आणायचे आणि कायदेशीर कोणतीही पूर्तता नसताना घिसाडघाईने काम सुरू करण्याचा प्रकार निलेश राणे यांनी केला आहे. जिल्ह्यातून विविध १२ विकासकामे परवानगी साठी केंद्राकडे पाठवली आहेत, यात राणेंच्या देवबाग बंधारा कामाचा समावेश नाही. निलेश राणे यांनी ज्याप्रमाणे तळाशील वासीयांची दिशाभूल केली तशीच दिशाभूल देवबाग वासीयांची करत आहेत. देवबाग वासीयांचे तात्पुरते समाधान करण्याचा प्रयत्न राणे करत आहेत. राणेंकडून होणाऱ्या बंधाऱ्याच्या कामाला पालकमंत्र्यांनी आडकाठी आणली नाही. विकासकामांना शिवसेनेचा पाठिंबाच आहे.
आणखी मोठ्या निधीची पत्रे निलेश राणे यांनी आणावीत, विकासकामांसाठी खुशाल निधी खर्च करावा. बंधाऱ्याच्या कामात शिवसेनेने कोणतीही आडकाठी आणलेली नसताना, त्याबाबत कोणताही ठोस पुरावा नसताना निलेश राणे शिवसेना आमदार, खासदारांवर आरोप करत आहेत. बंधाऱ्याच्या कामाचे खापर आमदार खासदारांवर फोडण्याचे काम करत आहेत, स्वतः अज्ञानी असल्याचे निलेश राणे यांनी दाखवून दिले आहे, अशी टीका हरी खोबरेकर यांनी केली.
तौक्ते वादळात शासनाकडून मदत आली त्यावर टीका करणे सोपे होते. मात्र निलेश राणे यांनी किती मदत केली याचे आत्मपरीक्षण करावे. टीका करताना अभ्यास करून करावी. आम. वैभव नाईक हे जनतेच्या भल्याचे निर्णय घेतात. कोरोना काळात विकासकामे होऊ न शकल्याने आमदारांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती. आमदारांनी केलेली विकासकामे जनतेला माहीत आहेत. राणेंच्या दाखल्याची आम्हाला गरज नाही, देवबाग खाडी किनारी बंधारा कामाच्या परवानग्या मिळविण्याचे कामही लवकरात लवकर होईल असेही हरी खोबरेकर म्हणाले.
