..तर संपूर्ण गाव वीज बीले भरणार नाहीत

मडुरा ग्रामस्थांचा वीज वितरणला इशारा;बांदा सहाय्यक अभियंत्यांना घेराव

बांदा ता.२६-:* मडुरा गावात वारंवार होणार्‍या वीजेच्या खेळखंडोबा बाबत स्थानिकांनी बांदा सहाय्यक अभियंता अनिल यादव यांना घेराव घालत जाब विचारला. दररोज सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत वीज खंडीत होत असल्याबाबत स्थानिक आक्रमक झाले. तसेच वीज वाहिन्यांवरील वाढलेली झुडपे, उघड्या अवस्थेतील डीपी बॉक्स, जीर्ण वीज वाहिन्या याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. सातार्डा केंद्रातून पर्यायी वीजपुरवठा होण्याबाबत सर्व्हे करण्याची मागणी करण्यात आली. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास संपूर्ण गावातून वीज बीले न भरण्याचा इशारा देण्यात आला. ग्राहकांच्या प्रश्नांसमोर अभियंता यादव हतबल झाले होते.

यावेळी मडुरा तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळू गावडे, उपसरपंच विजय वालावलकर, यशवंत माधव, प्रकाश सातार्डेकर, विजय परब, संदिप परब, प्रकाश वालावलकर, पिंटो परब, केशव परब, सोमनाथ तोरसकर, संतोष परब, नंदू सावळ, समीर परब, अभिजित परब, नारायण मोरजकर, तुषार धुरी, संतोष जाधव आदी उपस्थित होते.

मडुरा गावात वीजेचा अक्षरशः खेळखंडोबा सुरु आहे. सायंकाळ पासून रात्री उशिरापर्यंत वीज गायब असल्याने ग्राहक हैराण झाले आहे. वायरमन, वीज अधिकारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी बांदा वीज कार्यालयावर धडक देत अभियंता यादव यांना जाब विचारला. अवकाळी पावसातच वीज यंत्रणेची लक्तरे निघाली आहेत. पावसाळा सुरु होण्यापूर्वीच ही स्थिती असेल तर पावसाळ्यात काय परिस्थिती असेल असा प्रश्न यशवंत माधव यांनी उपस्थित केला.

संतप्त ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अभियंता यादव यांची भंबेरी उडताना दिसत होती. त्यांच्याकडून केवळ थातूरमातूर उत्तरे दिली जात असल्याने ग्रामस्थ आणखीनच संतप्त झाले. सातार्डा केंद्रातून पर्यायी वीजपुरवठा करण्याचा सर्व्हे करावा अशी मागणी करण्यात आली. सावंतवाडी उप अधीक्षक अभियंता घुरे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती सर्व्हे करण्याचे यादव यांनी मान्य केले. वीज समस्यांचे निराकरण न झाल्यास गावातून कोणीही वीज बीले भरणार नाहीत असा इशारा देण्यात आला.

You cannot copy content of this page