अधिकाऱ्यांसह ठेकेदाराचेही दुर्लक्ष : ग्रामस्थांचे मात्र त्रासदायक हाल
बांदा ता.२४-:* नुकत्याच दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने दांडेली-आरोस बाजार येथे खोदाई करण्यात आलेल्या पाईपलाईनची माती ग्रामस्थ संदीप माणगावकर यांच्या घरात घुसली. तसेच बाजारपेठेतील अन्य दुकानातही काही प्रमाणात पाणी शिरले. पाण्याला जाण्यासाठी मोरी पूल व गटार आवश्यक असताना त्याकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्षच केल्यामुळे आमच्यावर अशी परिस्थिती आल्याचे श्री. माणगावकर यांनी सांगितले.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत घटनास्थळी येत पाहणी करून कार्यवाही न केल्यास कार्यालयातच तळ ठोकणार असल्याचा इशारा ग्रामस्थ संदीप माणगावकर यांनी दिला. गुरुवारी झालेल्या पावसाचे पाणी दांडेली आरोस बाजार बाजारपेठेत घुसले. पाणी जाण्यासाठी मार्गच नसल्याने काही काळ रस्त्याला नदीचे स्वरूप आले.
परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पाणी थेट संदीप माणगावकर यांच्या घरात घुसले. त्यामुळे त्यांचेही नुकसान झाले. पावसाळा सुरू होण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी असून पुढे कोणतीच कार्यवाही न झाल्यास आपल्या घरासह दुकानात माती शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन दोन दिवसांत अपेक्षित कार्यवाही करणे आवश्यक आहे. अन्यथा आम्ही पावसाळ्यातच आपल्या कार्यालयात तळ ठोकून बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
रस्त्याच्या एका बाजूने पाईपलाईनसाठी खोदाई करण्यात आलेली साईडपट्टी धोकादायक बनली. आरोस बाजार या ठिकाणी दहा ते पंधरा गावातील नागरिक बाजार खरेदी करण्यासाठी येतात. त्यामुळे पावसात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बांधकाम विभागाने दखल घेऊन खोदाई करण्यात आलेल्या साईडपट्टीवर खडीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
