सबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करा; सरपंच आणि ग्रामस्थांची बांदा पोलिसात निवेदनाद्वारे मागणी…
बांदा/प्रतिनिधी बांदा शहरातील पाटो पूल ते मच्छिमार्केट रस्त्यावर पावसाळ्याच्या तोंडावर खासगी मोबाईल कंपनीकडून बेकायदा खोदण्यात आलेल्या रात्याचे काम आज सरपंच अक्रम खान व ग्रामपंचायत सदस्य यांनी रोखले. स्थानिक प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता काम करण्यात आल्याने संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी लेखी मागणी बांदा पोलीस ठाण्यात करण्यात आली. .
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शहरातील ग्रामीण मार्ग क्रमांक १०१ हा राष्ट्रीय महामार्ग ते पाटो पूल मच्छिमार्केट असा जातो. या मार्गांवरून वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. तसेच शेतात जाणारे शेतकरी देखील याच मार्गाचा वापर करतात. .
खासगी मोबाईल कंपनीची केबल टाकण्यासाठी या रस्त्याची बेकायदा खोदाई करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर डांबरीकरणाची कामे बंद झाल्याने या रेट्याची डागडुजी होणे कठीण आहे. तसेच स्थानिक प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता काम करण्यात आल्याने सरपंच अक्रम खान व ग्रामपंचायत सदस्य राजाराम सावंत, जावेद खतीब, साईप्रसाद काणेकर, राजेश विरनोडकर, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत हे आक्रमक झालेत. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित ठेकेदाराला जाब विचारला. रस्ता खोदाई केल्यानंतर पाऊस पडल्याने या संपूर्ण मार्गांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. सरपंच खान यांनी ग्रामपंचायतच्या वतीने बांदा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक तौसिफ़ सय्यद यांच्याकडे अर्ज देण्यात आला.
