*⚡मालवण ता.१७-:* मालवणात पर्यटनासाठी कुटुंबासमवेत आलेले महेंद्र भास्कर सुर्वे (वय ५२, रा. लक्ष्मी बिल्डिंग रेल्वे पोलीस स्थानक भायखळा मुंबई) हे चक्कर येऊन खाली पडल्याने त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्र सुर्वे हे आपल्या कुटुंबासमवेत पर्यटनासाठी मालवणात आले होते. ते भरड येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. आज सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान त्यांना चक्कर आली. ते खाली पडून बेशुद्ध झाल्याने त्यांना तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. याबाबत मालवण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश मोरे हे तपास करत आहेत.
