पावसाळी काळातही सर्व विभागांनी सतर्क राहून एकसंघ काम करावे – मालवण तहसीलदार

मालवण ता.११-:* येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुका मान्सूनपूर्व आढावा बैठक तहसीलदार अजय पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली आज तहसील कार्यालय येथे पार पडली. तौक्ते वादळात सर्वच विभागांनी सतर्क राहून एकसंघपणे काम केल्याने वादळाचा मोठा तडाखा बसूनही मदतकार्य व अपेक्षित काम शक्य झाले. येत्या पावसाळी काळातही सर्व विभागानी सतर्क राहून एकसंघ काम करावे. आपत्कालीन नियंत्रण कक्ष, मोबाईल २४ तास कार्यरत ठेवून अधिकारी, कर्मचारी यांनी सतर्क रहावे अशा सूचना तहसीलदार अजय पाटणे यांनी यावेळी तालुक्यातील सर्व विभागांना दिल्या.

या बैठकीस तहसीलदार अजय पाटणे यांच्यासह पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, आचरा पोलीस अधिकारी कुलदीप पाटील, नायब तहसीलदार श्री. कोकरे, आनंद मालवणकर तसेच विविध प्रशासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महावितरणने खंडित होणाऱ्या वीज पुरावठ्या बाबत माहिती तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, पोलीस ठाणे येथे द्यावी. ग्राहकांनी फोन केल्यास त्यांना सौजन्याने व योग्य माहिती द्यावी. वीज खांब व अन्य साहित्य उपलब्ध ठेवावे.

बीएसएनएल विभागानेही सेवा खंडित होणार नाही यासाठी तत्पर राहावे. बांधकाम विभागाने रस्त्याच्या बाजूला असलेली धोकादायक झाडे तोड तसेच अन्य उपाययोजना लवकर पूर्ण कराव्यात. पंचायत समिती विभागाने तालुक्यातील धोकादायक घरांची माहिती घ्यावी. तसेच आपत्ती काळात ज्या ठिकाणी स्थलांतर गरज निर्माण होऊ शकते अशा ठिकाणी स्थलांतर होणारी ठिकाणे शाळा अथवा अन्य इमारती सुस्थितीत ठेवाव्यात, अशा सूचना यावेळी तहसीलदारांनी केल्या. पतन विभागाने अतिक्रमण बाधित किनारपट्टी भागात आवश्यक त्या ठिकाणी मोठे दगड, माती पोती भरून बंधारा अथवा अन्य सुरक्षित उपाययोजना कराव्यात. आरोग्य विभागाने साथरोग किट तसेच पुरेसा औषध साठा सर्प दंश, विंचू दंश यावरील औषधेही पुरेशी उपलब्ध ठेवावीत. बंदर विभागाने भरती, ओहोटी वेळापत्रक प्रसिद्ध करावे.

मुसळधार पाऊस नद्यांना पूर स्थिती असल्यास व त्याच दिवशी उच्चतम भरती असल्यास त्याबाबत माहिती सर्व विभागाना आधी कळवावी. पर्यटन नौकाही बंद कालावधीत सुरक्षित ठिकाणी ठेवल्याची पाहणी करावी. मत्स्य विभागाने ३१ मे पर्यत सर्व मासेमारी नौका समुद्राबाहेर सुरक्षित स्थळी आल्या असल्याची नोंद घ्यावी. १ जून पासून नौका बंदरात समुद्रात दिसल्यास त्यावर कारवाई करून नौका बाहेर काढाव्यात अशा सूचना मत्स्य विभागाला केल्या. ७ जून पर्यत समुद्रात गस्त सुरू ठेवून समुद्रात दिसणाऱ्या नौकांवर कारवाई केली जाईल असे मत्स्य विभागाने स्पष्ट केले. तारकर्ली व सुकळवाड या दोन ठिकाणी मुख्य मार्गावर पुलाचे काम सुरू असून हे काम कधी पूर्ण होणार ? असा सवाल तहसीलदारांनी बांधकाम विभागाला केला असता ३१ मे पर्यत काम पूर्ण होईल असे बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page