विशाल परब:तुळस येथे ‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’ राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन..

⚡सावंतवाडी ता.०३-: भक्तिरसाची ओंजळ, परंपरेचा सुगंध आणि कोकणच्या मातीशी घट्ट नाळ जोडलेली भजनकला ही कोकणची सांस्कृतिक शान आहे. या समृद्ध परंपरेचे जतन करताना नव्या पिढीनेही या कलेचा वारसा अभिमानाने पुढे न्यावा, असे आवाहन भाजपा युवा नेते विशाल परब यांनी केले.
भारतीय जनता पार्टी तुळस व आरसी ग्रुप, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’ राज्यस्तरीय निमंत्रित संगीत भजन स्पर्धेचे गुरुवारी तुळस येथे दिमाखदार उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विशाल परब उपस्थित होते.
“भजन ही केवळ करमणुकीची कला नसून ती आपल्या संस्कृतीची, श्रद्धेची आणि सामाजिक एकात्मतेची वाहक आहे. पारंपरिक भजनी मंडळी आपल्या कलेच्या माध्यमातून हा सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवत आहेत. हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे,” असे परब यांनी सांगितले.
विशाल परब यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, मंडल अध्यक्ष पप्पू परब, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, संस्था अध्यक्ष विष्णू परब, मोहन मिस्त्री, दीपेश मिस्त्री, सागर सावंत, पोलीस पाटील अनिल परब यांच्यासह देवस्थान मानकरी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भजनी कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाच जिल्ह्यांतील भजनी मंडळांचा सहभाग
तुळस येथील कर्मयोगी कै. रामचंद्र य. तुळसकर सभागृह, श्री शिवाजी हायस्कूल येथे २ व ३ ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा रंगत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील निमंत्रित भजन मंडळांचा स्पर्धेत सहभाग आहे. त्यामुळे विविध भागांतील भजनशैली, गायनपरंपरा आणि संगीत साधनेचा सुरेल मिलाफ तुळस येथे अनुभवायला मिळत आहे.
नामांकित कलाकारांची जुगलबंदी, पारंपरिक भजनांचे सादरीकरण आणि स्पर्धक मंडळांच्या रंगतदार मैफलीमुळे तुळस परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला आहे.
भजनकलेला व्यासपीठ देण्याचा प्रयत्न
‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’च्या माध्यमातून भजनकलेला व्यासपीठ, कलाकारांना प्रोत्साहन आणि कोकणच्या सांस्कृतिक वारशाला नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे ही स्पर्धा केवळ विजेतेपदासाठीची चुरस न राहता कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचा उत्सव ठरत आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वैभव होडावडेकर, सुधीर झांट्ये, प्रमोद गोळम, पिंट्या राऊळ, विजय रेडकर, तेजस कुंभार, किशोर सावंत, सुभाष सावंत, राजेश भणगे, रत्नाकर शिरोडकर, बंड्या होडावडेकर, उमेश कुंभार, संतोष सावंत, नंदू बेहेरे, शुभम शेटकर, सिद्धेश शेटकर, नितीन कोचरेकर, पप्पू सावंत, रोहन सावंत, पुरुषोत्तम परब, नाथा परब, भैय्या घोगळे, आनंद माळकर, दत्ताराम माळकर, राजेश तुळसकर, हनू गावडे, घनश्याम गावडे, समीर तांबोसकर आणि दाजी चुडजी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष योगदान दिले.
भक्ती, संगीत आणि संस्कृतीचा हा सुरेल त्रिवेणी संगम अनुभवण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा तुळस व आरसी ग्रुप, तुळस यांच्या वतीने करण्यात आले आहे.
