Headlines

कोंडुरेत बीएसएनएल मोबाईल टॉवर उभारणीला सुरुवात…

ग्रामपंचायत मळेवाड-कोंडुरेचा बीएसएनएलसोबत करार; लवकरच मोबाईल सेवा होणार सुरू..

सावंतवाडी : मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायतीने भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) सोबत मोबाईल टॉवर उभारणीबाबतचा करार पूर्ण केला असून कोंडुरे येथे नव्याने बीएसएनएल मोबाईल टॉवर उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोंडुरे परिसरातील मोबाईल ग्राहकांची गैरसोय दूर होऊन लवकरच मोबाईल सेवा उपलब्ध होणार आहे.
सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील कोंडुरे हे स्वतंत्र महसुली गाव आहे. गावात मोबाईल टॉवरची सुविधा उपलब्ध नसल्याने मोबाईल ग्राहकांना गेल्या काही काळापासून नेटवर्कअभावी मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते.
खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून गावागावांत बीएसएनएलची मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध ठिकाणी मोबाईल टॉवर मंजूर करण्यात आले होते. त्यामध्ये कोंडुरे येथील टॉवरचाही समावेश होता. मात्र, टॉवर उभारण्यासाठी योग्य जागा उपलब्ध होत नसल्याने काम रखडले होते.
ही अडचण दूर करण्यासाठी मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायतीने पुढाकार घेत ग्रामपंचायत मालकीची जमीन बीएसएनएल मोबाईल टॉवरसाठी उपलब्ध करून देण्याचा एकमुखी ठराव मासिक सभेत मंजूर केला. त्यानंतर सरपंच मिलन पार्सेकर व उपसरपंच हेमंत मराठे यांनी पुढाकार घेत बीएसएनएलसोबत टॉवर उभारणीसंदर्भातील कराराची प्रक्रिया पूर्ण केली.
करार पूर्ण झाल्यानंतर आता कोंडुरे येथे मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरू झाले असून लवकरच या परिसरातील नागरिकांना बीएसएनएलची मोबाईल सेवा मिळणार आहे. या कामासाठी कोंडुरे ग्रामस्थांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. टॉवर उभारणीचे काम सुरू झाल्याने परिसरातील मोबाईल ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page