पाडलोसमधील शेतकऱ्याचे उपोषण स्थगित

अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन : नियोजन शून्य कामाचा परिणाम

बांदा दि.०४-:* तिलारी पाटबंधारे विभागाच्या नियोजन शून्य कामामुळे आपल्या शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले. स्वतःची जमीन असताना आज माझ्यावर खंडाची शेती करण्याची वेळ तिलारी पाटबंधारे विभागाने आणली आहे असे सांगत शेतकरी राजू माधव यांनी आपला रोष अधिकाऱ्यांवर व्यक्त केला. अखेर ग्रामस्थांचा आक्रमकपणा पाहून अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते श्री माधव यांना मागण्यांप्रमाणे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित करत असून मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा उपोषण छेडणार असल्याचे राजू माधव यांनी सांगितले.

महाराष्ट्रदिनी राजू माधव यांनी पाडलोस येथे एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले होते. यावेळी पाडलोस सहकारी सोसायटी चेअरमन तुकाराम शेटकर, भाजपा सातार्डा शक्ती केंद्र प्रमुख यशवंत ऊर्फ तात्या माधव, शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत, ग्रामस्थ विठू गावडे, चंदू गावडे, मंगेश नांगरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाडलोस-रोणापाल भागातून जाणाऱ्या तिलारी पाटबंधारे प्रकल्पालगत असलेली शेतजमीन अधिकाऱ्यांच्या अनास्थेपोटी कालव्यात कोसळली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत संरक्षक भिंत बांधण्याचे ठोस आश्वासन देत नुकसानभरपाई देणार असल्याचे सांगितले होते त्याला अधिकारी जागले नसल्याने आम्हाला उपोषणासारखा मार्ग अवलंबावा लागला असल्याचे राजू माधव यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना तात्या माधव यांनी जाब विचारला असता अतिवृष्टीमुळे जमीन वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र सदर जमीन ही अधिकाऱ्यांच्या नियोजन शुन्य कामामुळे वाहून गेल्याचे तात्या माधव म्हणाले. पाऊस दरवर्षी होतो जमीन कधीही वाहून गेली नाही आणि कालव्याचे काम सुरू झाल्यावरच जमीन वाहून कशी जाते असे खडे बोल तात्या माधव यांनी श्री कोरे यांना सुनावले. दरम्यान, शेजमिनीचे झालेले नुकसान देत संरक्षक भिंत बांधून देणार असल्याचे लेखी आश्वासन कनिष्ठ अभियंता महेंद्र डांबरेकर यांनी दिल्याने महाराष्ट्र दिनी पाडलोस येथील शेतकरी भीमसेन उर्फ राजू माधव यांनी आपले लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित केले. यावेळी ठेकेदार विरेश कित्ती उपस्थित होते.

You cannot copy content of this page