सत्यनारायण पुजेच्या मखरात साकारली स्वामी प्रतिमा

मालवण ता.२८-:* सत्यनारायण पूजेला मखर बनविणारे कलाकार केळीच्या सोपापासून विविध प्रकारच्या आकर्षक कलाकृती साकारत मखर बनवत असताना आचरा देवूळवाडी येथील बापर्डेकर यांच्या घरी सत्यनारायण महापूजेनिमित्त बांधण्यात आलेल्या मखरात मखर कलाकार युवक विक्रांत(मुन्ना)आचरेकर, प्रशांत सावंत, स्वप्निल बापर्डेकर यांनी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या औचित्यावर मखरात स्वामींची प्रतिमा साकारत स्वामींना आगळीवेगळी वंदना केली.

सत्यनारायण महापूजेचे आयोजनावेळी मखर बनविणारे कलाकार आकर्षक मखर बनविण्यासाठी आपापल्या कल्पनेप्रमाणे वेगवेगळ्या आकारात मखर बनवून शुभकार्याची शोभा वाढवित असतात. आचरा येथील विक्रांत उर्फ मुन्ना आचरेकर, प्रशांत सावंत,रुपेश पुजारे,चंदू कदम,रुपेश बागवे, हेमंत गोवेकर हे युवक एकत्र येत सार्वजनिक किंवा घरगुती कार्यक्रमात सत्यनारायण पूजेसाठी रात्रभर झटून विना मोबदला आकर्षक मखर बनवतात. आतापर्यंत त्यांनी आचरा येथील व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, काकड आरती मंडळाचे गंगा पूजन, पुजारे वाडी सार्वजनिक पूजा आदी ठिकाणी विविध आकारात कल्पकतेने केळीच्या सोपा पासून आकर्षक मखर बनवून कार्यक्रमांची शोभा वाढविली आहे. आचरा देवूळवाडी येथील बापर्डेकर यांच्या शुभ कार्यानिमित्त गुरुवारी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी असलेल्या स्वामी समर्थ पुण्यतिथीचे औचित्य साधत विक्रांत आचरेकर, प्रशांत सावंत, स्वप्नील बापर्डेकर यांनी केळीच्या सोपापासून विणेच्या आकाराची पुजा बांधून त्यात स्वामींची प्रतिमा साकारली आहे. त्यांच्या या कलेचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page