चंद्रशेखर मल्कमपट्टे लिखित ‘भूमिपुत्रांचे बाबासाहेब’ काव्यसंग्रहावर 30 रोजी चर्चासत्र

प्रा.सतीश बडवे, प्रा वंदना महाजन आदी अभ्यासकांचा सहभाग

कणकवली ता.२६-:* सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेतर्फे शनिवार 30 एप्रिल रोजी सायं. 6 वा. कवी चंद्रशेखर मल्कमपट्टे यांच्या ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘भूमिपुत्रांचे बाबासाहेब’ या दीर्घ कवितासंग्रहावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांनी दिली.

लेखनाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराकडे आता इतर बहुजन वर्गही वळताना दिसत आहे. चंद्रशेखर मल्कमपट्टे लिखित ‘भूमिपुत्रांचे बाबासाहेब’ हा काव्यसंग्रह याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने सदर चर्चासत्राचे आयोजन विविध मान्यवर अभ्यासकांच्या सहभागाने करण्यात आले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. सतीश बडवे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन होणाऱ्या या चर्चासत्रात मुंबई विद्यापीठाच्या विद्यमान मराठी विभाग प्रमुख आणि स्त्रीवादी समीक्षक प्रा. डॉ. वंदना महाजन, कवी चंद्रशेखर मल्कमपट्टे आणि कवयित्री प्रमिता तांबे आदी मान्यवर ‘भूमिपुत्रांचे बाबासाहेब’ काव्यसंग्रहवर मांडणी करणार आहेत.

प्रा. सतीश बडवे हे मराठीतील जेष्ठ लेखक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. विशेषतः संत साहित्याचे अभ्यासक म्हणून त्यांचा परिचय सर्वश्रुत आहे.अनेक ग्रंथांचे लेखन आणि संपादनही त्यांनी केले आहे. वंदना महाजन यांचा स्त्रीवादी लेखिका आणि समीक्षक म्हणून नावलौकिक आहे. साहित्य- सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले असून अनेक ग्रंथांचे संपादनही केले आहे. बुद्ध विचाराकडे- आंबेडकरवादाकडे ज्या बहुजन स्त्रिया वळल्या त्यांच्यावरील ‘कल्चरल करेक्ट’ हा त्यांचा संपादित ग्रंथ बहुचर्चित ठरला आहे.

शोषणमुक्त समाज अस्तित्वात आणण्यासाठी शेती मातीची नाळ जोडलेल्या माणसाची वेदना संपली पाहिजे. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा बुद्ध, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी असलेल्या जैविक नात्यांचे पदर उलगडत जातील. या अपेक्षांचा अत्यंत समर्थ असा काव्याविष्कार मल्कमपट्टे यांनी ‘भूमिपुत्रांचे बाबासाहेब’ या दीर्घकविते केला आहे. नवभांडवलशाही आणि जागतिकीकरणाच्या अरिष्टात आंबेडकरी विचारधारा सर्वसामान्य माणसाला वाचू शकते हे या कवितेचे अजून एक सूत्र आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून अधिक माहितीसाठी मनीषा पाटील ( 94228 19474) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री मातोंडकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page