बयाजी बुराण यांना गुरुगौरव पुरस्कार प्रदान

कणकवली ता.२६-:* कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेत पर्यवेक्षक पदी कार्यरत असलेले क्रीडा शिक्षक बयाजी महादेव बुराण यांना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गुरूगौरव पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. सदर कार्यक्रम चौंडेश्वरी सभागृह कणकवली येथे संपन्न झाला.

क्रीडा विषयाचे उत्कृष्ट मार्गदर्शक अशी श्री. बुराण यांची संपूर्ण जिल्ह्यामध्ये ख्याती आहे. अनेक राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांमध्ये त्यांनी आजवर उत्कृष्ट पंचगिरी केली आहे. गेली ११ वर्ष शालेय क्रीडा स्पर्धेसाठी कणकवली तालुका क्रीडा समन्वयक म्हणून ते कार्यरत आहेत. बयाजी बुराण हे शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच मास्टर गेम असोसिएशन सिंधुदुर्गचे ते सचिव आहेत. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ यांच्या वतीने देण्यात आलेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त आहे आतापर्यंत त्यांनी मार्गदर्शन केलेल्या १५ विद्यार्थ्यांची खो- खो खेळामध्ये राज्यस्तरावर तर १० विद्यार्थ्यांची कबड्डी खेळामध्ये राज्यस्तरावर निवड झाली आहे. कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे,तहसिलदार आर्. जे. पवार, भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या संजिता महापात्रा, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, कणकवलीचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, युनिक इन्फ्राचे संचालक सुशांत दळवी, सिंधुदुर्ग लाईव्ह व दैनिक कोकणसादचे एडिटर इन चीफ सागर चव्हाण, परफेक्ट अकॅडमीचे संचालक राजाराम परब इत्यादी मान्यवरांची सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती खजिनदार श्गणपत सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक सुमंत दळवी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी पर्यवेक्षक बयाजी बुराण यांचे अभिनंदन केले

You cannot copy content of this page