जावेद खतीब यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यांपासून वंचित राहू नयेत

बांदा/सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आधीच भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना, आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसमोरील संकट अधिक गडद केले आहे. हाताशी आलेले भातपीक पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे. या पार्श्वभूमीवर भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस तथा बांदा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे हाताशी आलेल्या भातपिकाचे नुकसान होण्याची भीती वाढली असून, शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
सध्याच्या निर्धारित मुदतीत जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे पूर्ण करणे अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंचनाम्यांसाठी मुदतवाढ देऊन नव्याने झालेल्या नुकसानीचीही योग्य ती नोंद घ्यावी, अशी मागणी श्री खतीब यांनी केली आहे.
जिल्ह्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणेला आवश्यक निर्देश द्यावेत. शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंतीही त्यांनी निवेदनातून केली आहे.
शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पंचनाम्यांच्या मुदतवाढीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा जावेद खतीब यांनी व्यक्त केली आहे.
फोटो:-
जावेद खतीब.
