सुरेंद्र दत्तात्रय तेंडुलकर चॅरिटेबल ट्रस्ट व राज राहुल तेंडुलकर यांचा स्तुत्य उपक्रम:यंदा भजन स्पर्धेऐवजी गावात बंधारे बांधण्याचा संकल्प..

⚡कुडाळ ता.१९-: गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरेंद्र दत्तात्रय तेंडुलकर चॅरिटेबल ट्रस्ट (तेंडोली) आणि राज राहुल तेंडुलकर यांच्या माध्यमातून तेंडोली गावातील ५० विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला गती देणारा आणि त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी काढले.
तेंडोली प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक १ येथे सोमवारी आयोजित सायकल वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, जिल्हा परिषद सदस्या आरती पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू, पंचायत समिती सदस्या प्रियांका जळवी, सरपंच अनघा तेंडोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दादा साईल म्हणाले, कोरोना काळापासून या ट्रस्टने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. कठीण परिस्थितीतही ट्रस्टने झोकून देऊन काम केले. या कार्यात मंगेश प्रभू यांचे मोठे योगदान असून, ते अत्यंत मेहनतीने सामाजिक उपक्रम राबवत आहेत. लहानपणी ज्या सायकली पाहायलाही मिळाल्या नव्हत्या, त्या आज विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मिळत आहेत, हे त्यांचे भाग्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, आगामी काळात पाणीटंचाईचे मोठे आव्हान उभे राहू शकते. त्यामुळे आजपासूनच पाणी बचतीचा संदेश प्रत्येकाने अंगीकारावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सायकलमुळे वाचणारा वेळ अभ्यासासाठी वापरा!
सभापती मिलिंद नाईक यांनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, तेंडोली गावातील नागरिक सर्वपक्षीय एकजुटीने काम करताना दिसतात. कुडाळ तालुक्यातील समृद्ध गाव म्हणून तेंडोलीकडे पाहिले जाते. सायकलींमुळे विद्यार्थ्यांचा शाळेत येण्या-जाण्याचा वेळ वाचणार असून, त्यांनी हा वेळ अभ्यासासाठी वापरावा. देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या तालुक्याचे, गावाचे, शाळेचे आणि आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.
उपसभापती सिताराम तेली म्हणाले, हा ट्रस्ट शिक्षण, आरोग्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे. प्रत्येक गावात अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या संस्था निर्माण झाल्यास गावांचा सर्वांगीण विकास साधता येईल. ट्रस्टचे कार्य केवळ तेंडोलीपुरते मर्यादित न राहता इतर गावांमध्येही विस्तारावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शासकीय स्तरावर काही अडचणी आल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. जिल्हा परिषद सदस्या आरती पाटील यांनीही ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले.भजन स्पर्धेऐवजी बंधारे बांधण्याचा संकल्प
ट्रस्टचे अध्यक्ष मंगेश प्रभू यांनी प्रास्ताविकात ट्रस्टच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. २०२२ पासून कार्यरत असलेल्या या ट्रस्टच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल तेंडुलकर आणि राज तेंडुलकर यांचे ट्रस्टच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यंदा दुष्काळसदृश परिस्थिती आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ट्रस्टमार्फत दरवर्षी आयोजित केली जाणारी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी खर्च होणाऱ्या निधीतून गावात बंधारे बांधण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहिती मंगेश प्रभू यांनी दिली. यापुढेही ट्रस्टचे सामाजिक कार्य अधिक जोमाने सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात तेंडोली प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक १ च्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन आणि स्वागतगीताने केली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीच्या माजी सदस्या माधवी प्रभू, ग्रामपंचायत सदस्य बाळू पारकर, ग्रामपंचायत सदस्या उत्कर्षा प्रभू, कुडाळचे गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत, तेंडोली केंद्रप्रमुख श्री. तांबे, तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान तेंडोलकर, रवळनाथ देवस्थानचे सचिव प्रमोद राऊळ, मुख्याध्यापिका राजश्री खोत, शिक्षक सदानंद पाटील, शिक्षिका समीक्षा परब, मृणालीनी चव्हाण, अनुष्का पाटकर, प्रगतशील शेतकरी अच्युत तेंडोलकर, संदीप प्रभू तेंडोलकर यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र राऊळ, शशिकांत आरोलकर, भगवान गावडे, संदीप प्रभू आणि विष्णू तेंडोलकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. राधाकृष्ण परब यांनी सूत्रसंचालन केले, तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू तेंडोलकर यांनी आभार मानले.
