वेंगुर्ला पंचायत समितीमार्फत 651 कच्चे – वनराई बंधारे व 76 जलतारा पूर्ण….

⚡वेंगुर्ला ता.१९-: सन 2026 या वर्षात पावसाचे अत्यल्प प्रमाणामुळे आंबा काजू बागायतदारांसह शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीच सामोरे जावे लागले आहे. यावर्षी पाऊसही कमी प्रमाण तसेच शेतीचेही अत्यल्प प्रमाण राहिले आहे. दरम्यान शुक्रवारी पहाटे वेंगुर्ला तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आज सोमवारी दुपारी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला वेंगुर्ला तालुक्यात विजेच्या गडगडाटासह जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गाची ही धावपळ उडाली.
त्यामुळे बराच कालावधीपासून वाढलेली उष्णता थोडाफार कमी होऊन हवेत गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान अचानक झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी कापणी केलेले भात भिजून गेले आहे, तर बऱ्याच ठिकाणी अद्याप भात परिपक्व झाले नसून सध्या संपूर्ण तालुक्यात व शहरात प्रशासनामार्फत पाणी अडवा.. मोहीम व्यापक स्वरूपात कच्चे व वनराई बंधारे घालून राबविण्यात येत आहे. सध्या शेतकऱ्यामार्फत शेतीच्याच ठिकाणी भात झोडपणी केली जात आहे. दुष्काळजन्य परिस्थितीनंतर शासनाच्या आवाहनानंतर वेंगुर्ला तालुक्यात वेंगुर्ला पंचायत समितीमार्फत दि. 19 ऑक्टोबर पर्यंत एकूण 651 कच्चे – वनराई बंधारे व 76 जलतारा शोषखड्डे मारण्यात आले आहेत. वेंगुर्ला पंचायत समिती अधिकारी, सर्व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी तसेच अन्य संघटना, ग्रामस्थ यांच्यामार्फत वनराई कच्चे बंधारे साठी श्रमदान केले जात आहे, यात महिला वर्ग ही मोठ्या संख्येने सहभागी होत असून तालुक्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. वेंगुर्ला नगरपरिषद मार्फतही शहरात बंधारे बांधणे काम सुरू आहे. वेंगुर्ला सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, अन्य विभागाचे अधिकारी यांनी या मोहिमेत सक्रियपणे भाग घेतला आहे.
