सावंतवाडी ता.२६-:* दोडामार्ग येथील श्री महागणपती सिद्धिविनायक देवस्थान व कै.श्री.पांडुरंग गोविंद गवस प्रतिष्ठान तथा सेवाभावी संस्था मांगेली-तळेवाडी, दोडामार्गच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे यांना ‘आदर्श सामाजिक नेतृत्व कार्यभूषण पुरस्कार-२०२२’ देऊन सन्मानित करण्यात आले.
मांगेली येथे श्री महागणपती सिद्धिविनायक देवस्थानच्या सहाव्या वर्धापन दिनी आयोजित शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात अनिल राणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा पंचायत समिती सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते बाबुराव धुरी, कोकणसाद LIVE चे ब्युरो चीफ संदीप देसाई, सरपंच विश्वनाथ गवस, उपसरपंच एकनाथ गवस, पत्रकार सुहास देसाई, विठ्ठल गवस, पोलीस पाटील विलास शेटकर, श्रेयाली गवस, संतोष मोर्ये, शाबी तुळसकर, नारायण गवस, लक्ष्मण गवस, वासुदेव गवस, दिलीप गवस, संदेश गावकर, माजी सरपंच विजय गवस, कृष्णा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोकणसादचे ब्युरो चीफ संदीप देसाई यांच्या हस्ते अनिल राणे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अनिल राणे यांनी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
प्रत्येक संकटकाळात अनिल राणे हे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाजूने भक्कम उभे राहतात, तसेच विधायक उपक्रम राबवून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना सन्मानित करण्यात ते अग्रेसर आहेत. श्री.राणे यांच्या एकूण कार्याची दखल घेत श्री महागणपती सिद्धिविनायक देवस्थान व कै.श्री. पांडुरंग गोविंद गवस प्रतिष्ठान तथा सेवाभावी संस्था, मांगेली-तळेवाडी, दोडामार्ग यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी सत्काराला उत्तर देताना अनिल राणे म्हणाले की, यापुढेही आपण शिक्षक व शिक्षकेतर बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहू. आपल्याला मिळालेला पुरस्कार हा केवळ माझा नाही तर तो संपूर्ण शिक्षकेतर कर्मचारी बांधवांचा हा सन्मान आहे असे मी मानतो, असे सांगत अनिल राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
