वेंगुर्ला ता.२६-:* कुडाळ दाभोलीमार्गे वेंगुर्ला रस्त्यावरील वेतोरे-खांबडवाडी येथील पुलाच्या अर्धवट कामाबाबत तसेच अपूर्ण डांबरीकरणाबाबत सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना वारंवार निवेदने देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतत्प झालेल्या वेतोरे-वरचीवाडी, खानोली, दाभोली, वायंगणी गावातील ग्रामस्थांनी २५ एप्रिल रोजी सातेरी मंदिर येथे रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वेंगुर्ला उपविभागीय अभियंता भगत यांनी पुलाचे अर्धवट काम आणि डांबरीकरण त्वरित सुरु करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतुक दोन तास ठप्प होती.
या आंदोलनात सरपंच राधिका गावडे, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर, ग्रामपंचायत सदस्य सुधीर गावडे, अरुण राऊळ, नाना वालावलकर, यशश्री नाईक, ग्रामस्थ दिपक नाईक, विजय नाईक, लवू नाईक, प्रविण गावडे, चंद्रकांत वालावलकर, संदिप सावंत, राधाकृष्ण वेतोरकर, विद्याधर प्रभूखानोलकर, सुनिल घाग, अनिल नाईक, शैलेश जामदार यांच्यासह वेतोरे, खानोली, दाभोली पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
