१९ वर्षाखालील मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप

२५ एप्रिल पासून मोहिमेला प्रारंभ

ओरोस ता.२६-:राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या निमित्ताने २५ एप्रिल ते २९ एप्रिल २०२२ या पाच दिवसांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत असून वयवर्ष १ ते १९ वयोगटातील सुमारे १ लाख ५० हजार बालकांना जंतनाशक गोळ्या ( अल्बेंडाजोल ) देण्याचे काम चालू करण्यात आले आहे. या मुलांना आरोग्य केंद्रातून व गृहभेटी मार्फत या गोळ्या देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ संदेश कांबळे यांनी दिली. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त सोमवार पासून १ ते १९ वयोगटातील १ लाख ५० हजार बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे काम चालू करण्यात आले आहे. यामध्ये १ ते ६ वयोगटातील ४० हजार मुलांचा समावेश आहे. या मोहिमेसाठी सर्व स्तरावरील यंत्रणा व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व बालकांपर्यंत जंतनाशक गोळी पोहोचवून त्यास ती खाऊ घालण्यात येणार आहे. गोळी दिलेल्या प्रत्येक बालकाची नोंद ठेवण्यात येत आहे.

१ ते १९ वर्षातील किमान २८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तीक व परिसर स्वच्छतेचा अभाव असतो. कृमीदोष हा रक्तक्षय व कुपोषणाचे कारण आहेच. तसेच बालकांची शारिरीक व बौद्धिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते.

ही बाब लक्षात घेवून १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व शालेय वयोगटातील विद्यार्थी (शाळेतील व शाळाबाह्य) यांना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमाचा उद्देश आहे. संस्था स्तरावर शाळा महाविद्यालयातील मुलांना जंतनाशक गोळ्या देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर समुदाय स्तरावर आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविकांमार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घरोघरी जावून शाळेत न जाणाऱ्या १ ते १९ वर्षाच्या मुलांना २५ एप्रिल ते २९ एप्रिल पर्यंतच्या कालावधीत जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. यामध्ये अंगवाडीत नोंदणी झालेली बालके, अंगणवाडीत नोंदणी न झालेली बालके, शासकीय शाळांमध्ये नोंदणी झालेली बालके, खासगी शाळांमध्ये नोंदणी झालेले बालके व शाळेत नोंदणी करण्यात आलेल्या बालकांचा समावेश आहे. तसेच दोन वर्षाआतील बालकांना अर्धी गोळी देण्यात येत आहे.

You cannot copy content of this page