तंत्रशिक्षण संचालक डॉ अभय वाघ यांनी मालवण तंत्रनिकेतनला भेट देऊन जाणून घेतल्या समस्या…

आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून मंजूर झालेल्या २४ कोटी रुपयांच्या खर्चाची दिली माहिती…

*⚡मालवण ता.२५-:* मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील विविध समस्यांबाबत युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधल्यानंतर तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ व वरिष्ठ अधिकारी यांनी तंत्रनिकेतनला भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी डॉ. वाघ यांनी आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून तंत्रनिकेतनमध्ये मंजूर झालेल्या २४ कोटी रुपये खर्चाच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरची माहिती दिली. तर आम. वैभव नाईक यांनी मालवणचे शासकीय तंत्रनिकेतन अद्ययावत होण्यासाठी कॉलेज प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे सांगितले. काही दिवसांपूर्वी शासकीय तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्यांनी येथील समस्येकडे युवासेनेचे लक्ष वेधले होते. त्यावेळी युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, सिद्धेश मांजरेकर, विशाल परब, विराज बोवलेकर, अथर्व अणावकर आणि सहकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे या समस्या मांडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज येथील शासकीय तंत्रनिकेतनला भेट देऊन बैठक घेतली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट दिली. यावेळी व्यासपीठावर तंत्रशिक्षणचे सहसंचालक प्रमोद नाईक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ संचालक विनोद मोहितकर, प्राचार्य सुरेश पाटील, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, कुंभारमाठ सरपंच प्रमोद भोगावकर, किरण वाळके, गौरव वेर्लेकर, तपस्वी मयेकर, अमित भोगले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ म्हणाले, आमदार नाईक यांच्या मागणीमुळे स्किल डेव्हलपमेंट सेंटर याठिकाणी सुरू होणार आहे. येथे विविध प्रकारचे १७ अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. यामध्ये पर्यटनावर आधारित अभ्यासक्रमाचा देखील समावेश आहे. या केंद्रात दहावी नापास विद्यार्थ्यांना देखील स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी संधी दिली जाणार आहे. ग्रामीण भागातील मुलांना याचा लाभ मिळणार आहे. त्याशिवाय येथील सुसज्ज प्रयोगशाळेसाठी देखील आमदार नाईक यांच्या प्रयत्नांमुळे ५० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. येथील समस्या आमदारांकरवी आमच्या पर्यंत मांडाव्यात, तुमचे प्रश्न निश्चितच सुटतील, असेही डॉ. वाघ म्हणाले. यावेळी आमदार नाईक यांनी शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीला ३० वर्षे पूर्ण झाल्याने येथील इमारतीच्या नूतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी सल्लामसलत करून आराखडा बनवून घेण्याची सूचना कॉलेज प्रशासनाला केली.

पावसाळी अधिवेशनात या इमारतीसाठी निधी मंजूर करून घेण्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला. उदय सामंत यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण खाते आल्यानंतर आपण शासकीय तंत्रनिकेतन मध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीला श्री. सामंत यांनी तत्काळ होकार दिल्याबद्दल आमदार नाईक यांनी त्यांचे आभार मानले. येत्या जून महिन्यापासून हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर कार्यान्वित होईल असे सांगून सिंधुदुर्गात शासकीय डी फार्मसी कॉलेज सुरू करण्यासाठी देखील आपला प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय तंत्रनिकेतनसाठी ज्या जागा गरजा असतील त्याची यादी आपल्याकडे द्या, त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच तंत्रनिकेतन मध्ये स्विमिंग पूल उभारण्यात यावे, यासाठीचा आराखडा तयार करावा अशी सूचना यावेळी आम. नाईक यांनी केली.

You cannot copy content of this page