पाल्यांना शिक्षणाद्वारे आर्थिकदृष्टीने सक्षम बनवावे

निवृत्त मुख्याध्यापक वाय आर राजूरकर : मालवण भंडारी ए. सो. हायस्कुलच्या १९९१- ९२ सालच्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

*⚡मालवण ता.२४-:* माणसाने कोणत्या जाती धर्मात जन्माला यावे हे त्याच्या हातात नसते परंतु जीवनात कोण व्हावे हे आपल्या हातात असते म्हणून प्रत्येकाने आपल्या पाल्याना चांगले आणि उच्च शिक्षण देऊन त्याला आर्थिकदृष्टीने सक्षम बनवावे असे प्रतिपादन भंडारी हायस्कूल मालवणचे माजी मुख्याध्यापक वाय आर राजूरकर यांनी येथे बोलताना केले मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या १९९१- ९२ सालच्या दहावी बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा भंडारी हायस्कुलमध्ये उत्साहात संपन्न झाला. ३० वर्षांनी पुन्हा एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी वर्गात बसून शालेय आठवणींची मैफिल रंगवितानाच त्यावेळच्या आपल्या गुरुजनांसोबत या स्नेहमेळाव्याचा आनंद लुटला. या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन भंडारी हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक वाय. आर. राजूरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच माजी पर्यवेक्षक रवींद्र वराडकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक जयवंत ढोलम, श्री. पाटकर, श्री. प्रकाश कदम, श्री. ध्रुवकुमार रानडे, सेवानिवृत्त शिक्षिका सौ. स्नेहा साटलकर, सौ. ज्युलि फर्नांडिस, प्रशालेचे मुख्याध्यापक वामन खोत, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते. यावेळी प्रारंभी नागेश साठे यांनी बॅचतर्फे सर्वांचे स्वागत केले.

तर मुख्याध्यापक वामन खोत यांनी प्रास्ताविक करत माजी विद्यार्थी हे शाळेची संपत्ती आहेत, माजी विद्यार्थी शाळेकडे लक्ष देतात ही महत्त्वाची गोष्ट असून अशा स्नेहमेळाव्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळतो असे सांगितले. यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून उपस्थित मान्यवर शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माजी मुख्याध्यापक श्री. राजूरकर यांनीही जुन्या आठवणींना उजाळा देताना माजी विद्यार्थ्यांना पुन्हा भेटताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आपणास पहावयास मिळत आहे. विद्यार्थी होते म्हणून आम्ही शिक्षक होतो. आमची धडपड ही केवळ विद्यार्थ्यांसाठी असायची, मी विद्यार्थ्यांनाच देव मानतो, माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांनाही चांगले शिक्षण द्यावे, सकारात्मक दृष्टीने चांगले आयुष्य व्यतीत करावे असे यावेळी राजूरकर यांनी सांगितले.

यावेळी माजी विद्यार्थ्यांमधून सागर मिसाळ, प्रशांत पाटील, नागेश साठे,अर्जुन आचरेकर विश्वास पेडणेकर,सुभाष कुमठेकर यावेळी सौ स्वाती हडकर-कुडतरकर, कालिंदी घाडीगांवकर यांनी मनोगते व्यक्त करत शालेय आठवणींना उजाळा देतानाच शाळेसाठी माजी विद्यार्थ्यांचे नेहमीच सहकार्य लाभेल असे सांगितले. यावेळी बॅचतर्फे शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके भेट देण्यात आली. यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या स्नेह मेळाव्यास ४९ माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी केले. तर आभार श्री. आचरेकर यांनी मानले. यावेळी या बॅचचे बहुसंख्य माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page