मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि ओझर विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी डॉ. सुहास पेडणेकर यांचे प्रतिपादन…
मालवण दि प्रतिनिधी दगडावर कोरीव काम करून जशी मूर्ती घडवली जाते तसेच शाळेत शिक्षक विद्यार्थी घडवत असतात. हेच विद्यार्थी जेव्हा समाजात एखाद्या उच्चपदावर जातात तेव्हा मागे वळून बघताना आपल्या शिक्षकांनी, आपल्या शाळेने दिलेले योगदान कित मोठे होते याची जाणीव होते. मलाही ओझर विद्यामंदिर सारख्या शाळेत शिकण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो, बिकट परिस्थितीतून उभी राहिलेले ओझर विद्यामंदिर भविष्यातही दैदीप्यमान वाटचाल करेल असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि ओझर विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी डॉ. सुहास पेडणेकर यांनी येथे बोलताना केले.
मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहायक समिती संचलित कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिरचा हिरक महोत्सवी सोहळा आज शनिवारी साजरा झाला. या सोहळ्याचे उद्घाटन शिवसेना नेते खास. गजानन कीर्तिकर व खास.विनायक राऊत यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सोहळ्याचे स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, आमदार वैभव नाईक, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब, सरपंच सौ. उमदी परब, मिस टुरिझम युनिव्हर्स आशिया विजेती मूळ कांदळगावची सुकन्या श्रिया परब, सौ.सुलेखा चव्हाण, माजी सभापती उदय परब आदी उपस्थित होते.
प्रारंभी जी. एस. परब यांच्या प्रस्ताविकाचे शिक्षक श्री. शेर्लेकर यांनी वाचन केले. यात परब यांनी ओझर विद्यामंदिरच्या जडणघडणीची माहिती देत शाळेसाठी मदत करणाऱ्या दानशूरांचे आभार मानले. यावेळी खास. गजानन कीर्तिकर, खास.विनायक राऊत, कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, आमदार वैभव नाईक, श्रिया परब यांच्यासह अन्य मान्यवरांचा शाळेतर्फे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. पेडणेकर म्हणाले, शिक्षण हे स्वतःला शोधण्यासाठी आणि राष्ट्र उभारणी साठी असते. शिक्षकांनी नवनवीन पद्धतीने शिक्षण दिले पाहिजे.
शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाचा मोठा वापर होत असून त्याद्वारे शिक्षकांनी बदल घडविला पाहिजे. केवळ पुस्तकी ज्ञान भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी पुरेसे नाही. विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास साधणारे शिक्षण घेतले पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना आम. नाईक म्हणाले, शिक्षणामुळे क्रांती झाली आहे. आज विकासाचा वेग वाढतोय, शिक्षण पद्धतीत देखील बदल होत आहेत. ओझर विद्यामंदिर सारख्या दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळेत शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी हे भाग्यवान आहेत. या शाळेस आपले नेहमीच सहकार्य लाभणार असून आमदार फंडातून ५ लाख रुपयांचा निधी मदत म्हणून आपण देणार आहोत, असेही ते म्हणाले.
यावेळी खास. राऊत म्हणाले, जागतिक स्तरावर नावलौकिक असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर बसणारी व्यक्ती ओझर शाळेने निर्माण केली. कुलगुरू डॉ. पेडणेकर आज शिक्षणाला नवी दिशा देत आहेत. जिल्ह्याने जशी नवरत्न दिली तशी ओझर शाळेने रत्ने दिली आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याचा आज शैक्षणिक क्षेत्रात असलेला नावलौकिक इथल्या शाळांनी, शिक्षकांनी निर्माण केला आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून या शाळेसाठी आपण निधी कमी पडू देणार नाही, असेही खास. राऊत म्हणाले. यावेळी खास. गजानन कीर्तिकर यांनी ओझर शाळेच्या संस्थापकांनी साठ वर्षांपूर्वी दूरदृष्टी ठेवून ही शाळा स्थापन केली. अनेक अडचणींवर मात करत शाळा सुरू केली. त्यांच्या कार्याला आपण अभिवादन करतो. जी. एस. परब यांच्या सोबत काम करताना आपण कांदळगाव व या शाळेची जडण घडण जवळून पहिली आहे. आजच्या शिक्षणामध्ये कौशल्य विकासावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाची कास धरावी, नोकऱ्यांसाठी आपण सहकार्य करू असेही खास. कीर्तिकर म्हणाले. यावेळी श्रिया परब व सुलेखा चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी हिरकमहोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध शालेय स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तर शाळेला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच चैतन्य पाटील यांच्यावतीने देण्यात आलेल्या पाच सायकलींचे शाळेतील गरजू मुलींना वाटप करण्यात आले. तर नितीन पाटील यांनी सायकलींसाठी निधी सुपूर्द केला.
तर प्रशालेच्या हिरक महोत्सवी स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्था संचालक नंदकुमार राणे, दिलीप राणे, शरद परब, शांताराम परब, शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे, सदस्य विजय कांबळी, विजय कुमार शेलटकर, विशाल राणे, श्रीराम परब, रवींद्र सुतार, मुख्याध्यापक श्री खोत, रंजना नेवाळकर, उद्योजक नितीन पाटील, चैतन्य परब, माजी मुख्याध्यापिका श्रीमती मुरवणे, आशिष पेडणेकर, डॉ. नागेश पवार, तुळशीदास देसाई, आशिष परब आदी व इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. डी. जाधव यांनी केले.
