मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जयसिंग नामदेव पाटील यांना जाहीर झाला आहे. तर आदर्श शिक्षक पुरस्कार मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कूलचे पर्यवेक्षक हनुमंत बिरु तिवले यांच्यासह अन्य चौघां शिक्षकांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण उद्या रविवार दिनांक २४ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या सभागृहात प्रदान केला जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा जिल्हा स्नेहमेळावा रविवारी २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्ग नगरी, ओरोस पतपेढी सभागृह येथे महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मा. श्री ज्ञानेश्वर कानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत, आरवली सोनसुरे संस्थेचे क्षेत्राधिकारी शिवचैतन्य आजोबा महाराज, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. बी. डी. पाटील, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. सागर पाटील हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक संघाच्या वतीने विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारात आदर्श शिक्षक पुरस्कार ज्ञानदीप विद्यालय हिवाळेचे शिक्षक महेंद्र नाईक, काळसे येथील शिवाजी विद्यामंदिर काळसेचे शिक्षक तुकाराम सदाशिव पेडणेकर, टोपीवाला हायस्कूल मालवणच्या शिक्षिका सौ. ज्योती रविकिरण तोरसकर, पेंडूर हायस्कूलच्या शिक्षिका सौ. अर्चना शिवराज गरुड आणि यांना तर आदर्श शिक्षकेतर पुरस्कार रघुनाथ तुकाराम त्रिनबकर याना जाहीर झाला असून या सर्व पुरस्कारांचे वितरण या स्नेह मेळाव्यात केले जाणार आहे तरी या स्नेहमेळाव्यात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पावसकर व सचिव पांडुरंग काळे यांनी केले आहे.
