मालवण (प्रतिनिधी)

पारंपारिक उखाण्यांना आधुनिक कल्पकतेची जोड देत महिलांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी देण्याच्या दृष्टीने बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने महिलांसाठी उखाणे स्पर्धेचे आयोजन रविवार दि. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता करण्यात आले आहे.
ही स्पर्धा सर्व महिलांसाठी खुली असून विवाहित, कुमारिका, विधवा अशा सर्व महिलांना आणि सर्व वयोगटांतील स्पर्धकांना यात सहभागी होता येणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेतीला सुंदर पैठणी साडी, तर द्वितीय क्रमांकाच्या विजेतीला आकर्षक कोल्हापुरी साज आणि तृतीय क्रमांकाच्या विजेतीला हँडबॅग देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला स्वतःचा उखाणा तोंडपाठ करून सादर करावा लागणार आहे. उखाणा मराठी किंवा मालवणी भाषेत सादर करता येईल. उखाण्यात अश्लील, आक्षेपार्ह किंवा कोणत्याही व्यक्ती अथवा समाजाच्या भावना दुखावणारा आशय नसावा.
या स्पर्धेतील विजेत्यांना २९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनात मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात येतील. सहभागी महिलांना संमेलनस्थळी सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मालवण आणि परिसरातील महिलांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने करण्यात आले आहे.
