Headlines

मालवण बंदर जेटीवरील स्वच्छतागृहाची दुरवस्था अखेर दूर…

शिल्पा खोत यांच्या आक्रमक भूमिकेनंतर नगरपरिषद प्रशासन हरकतीत…

मालवण दि प्रतिनिधी

मालवणच्या पर्यटनाचे मुख्य केंद्र आणि ओळख असलेल्या ‘बंदर जेटी’ परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची गेल्या कित्येक दिवसांपासून झालेली दुरवस्था आणि अस्वच्छतेचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. स्थानिक व्यापारी व नागरिकांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर शिल्पा खोत यांनी तत्परतेने पालिका प्रशासनाला धारेवर धरत प्रत्यक्ष घटनास्थळी ‘स्पॉट पंचनामा’ केला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे नगरपरिषद प्रशासनाला तात्काळ दखल घ्यावी लागली असून स्वच्छतागृहाची स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बंदर जेटीवरील स्वच्छतागृहात प्रचंड अस्वच्छता पसरली होती. दुर्गंधी आणि घाणीच्या साम्राज्यामुळे येथे येणारे पर्यटक तसेच स्थानिक व्यापारी हैराण झाले होते. ही बाब स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी शिल्पा खोत यांच्या निदर्शनास आणून दिली.
शिल्पा खोत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, या स्वच्छतागृहात पाण्याचा पुरवठाच सुरळीत नसल्याचे उघडकीस आले. पालिकेने पाण्याच्या टंचाईची अडचण त्यांच्या कानावर घातली. मात्र, “पाणी हा स्वच्छतेचा मुख्य पाया आहे. पाण्याची सोय नसणे हे प्रशासकीय दुर्लक्ष आहे. यामुळे विशेषतः महिलांच्या आरोग्याचा आणि स्वच्छतेचा प्रश्न टांगणीला लागला आहे,” असे ठामपणे सांगत खोत यांनी या घटकाकडे नगरपरिषदेने तात्काळ लक्ष पुरवण्याची आक्रमक मागणी केली.

महिला आरोग्याची गंभीर बाब लक्षात येताच शिल्पा खोत यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता मालवण नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना थेट जेटीवर पाचारण केले. तिथे प्रत्यक्ष ‘स्पॉट पंचनामा’ करून प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्यास भाग पाडले. खोत यांच्या या दणक्यामुळे पालिका प्रशासन वेगाने हरकतीत आले आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ पावले उचलत स्वच्छतागृहाची पूर्णपणे स्वच्छता करून पाणीपुरवठा सुरळीत केला.

स्वच्छतेचे काम पूर्ण झाल्यानंतर शिल्पा खोत यांनी मालवण नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक संजय पवार आणि उपस्थित पालिका कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

पर्यटनाचा मुख्य कणा असलेल्या बंदर जेटीवर निर्माण झालेली ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि खंबीर भूमिकेबद्दल स्थानिक व्यापारी आणि नागरिकांच्या वतीने शिल्पा खोत यांचे विशेष आभार मानण्यात आले. भविष्यातही या जेटीवरील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने नियमित लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा यावेळी स्थानिकांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page