तिलारीच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे नुकसान : शेतकरी राजू माधव यांचा आरोप
बांदा ता.२३-:* पाडलोस-रोणापाल भागातून जाणाऱ्या तिलारी पाटबंधारे प्रकल्पालगत असलेली शेतजमीन अधिकाऱ्यांच्या अनास्थेपोटी कालव्यात कोसळली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत संरक्षक भिंत बांधण्याचे ठोस आश्वासन देत नुकसानभरपाई देणार असल्याचे सांगितले होते. परंतु एक वर्षांचा कालावधी उलटूनही भरपाई तर सोडाच पण संरक्षक भिंतही बांधली गेली नाही. त्यामुळे आपली उरलीसुरली शेत जमीन वाचविण्यासाठी व भरपाई मिळण्यासाठी आपण 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी पाडलोस येथेच उपोषणास बसणार असल्याचे निवेदन शेतकरी राजू माधव यांनी तिलारी लघुपाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना दिले आहे.
गेल्यावर्षी जून महिन्यात झालेल्या पावसात शेतकरी राजू माधव यांची जमीन कालव्याच्या वरच्या बाजुने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. पाऊस पडण्यापूर्वी शेतीच्या खालच्या बाजूने संरक्षक भिंत बांधणे आवश्यक असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले होते.
परंतु पाण्याच्या प्रवाहाचा भौगोलिक अभ्यास न करताच अतिशय बेजबाबदारपणे अधिकाऱ्यांनी काम केल्यामुळे माझ्या शेतीचे नुकसान झाले. सदर घटनेची कल्पना दिल्यानंतर अधिकाऱ्यांना जमीन वाचविण्यासाठी अनेक वेळा विनंत्या केल्या. त्याप्रमाणे अधिकारी व कंत्राटदारांनी घटनास्थळी भेट देत नुकसानभरपाई देऊन सदर ठिकाणी संरक्षक भिंत बांधून देण्याचे आश्वासनही दिले. परंतु त्याचे स्मरण अधिकाऱ्यांनाच राहिले नसल्याचे राजू माधव यांनी सांगितले. तिलारी पाटबंधारे अधिकाऱ्यांनी घटनेची दखल न घेतल्यामुळे यावर्षी पावसाळ्यात उरलीसुरली शेतजमिनी वाहून जाणार आहे. त्यामुळे आपल्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. माझी शेत जमीन वाचविण्यासाठी नाईलाजास्तव 1 मे रोजी महाराष्ट्र दिनादिवशी घटनास्थळी म्हणजे पाडलोस येथेच उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन श्री. माधव यांनी अभियंत्यांना दिले.
