ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या भातशेती नुकसानीची भरपाई नाही

जयप्रकाश पारकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

सिंधुदुर्गनगरी ता २२ सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्टोबर २०२० मध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याला १८ महिने होऊन गेले तरी अद्यापही कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई रक्कम मिळाली नाही. याबाबत आज कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश पारकर यांनी जिल्हाधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्टोबर २०२० या कालावधीत अवकाळी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संबंधित नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसानीची रक्कम निश्चित करण्यात आली होती. मात्र कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानीची रक्कम मिळालेली नाही. याबाबत वेळोवेळी शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येउनही अद्याप पर्यन्त संबंधित कणकवली तालुक्यातील शेतकरी नुकसान भरपाई अनुदाना पासून वंचित राहिले आहेत. कणकवली तालुक्यासाठी १ कोटी २४ लाख ५७ हजार ८०० एवढी नुकसानभरपाई रक्कम निश्चित झाली होती.

नुकसानी होऊन तब्बल १८ महिने होऊन गेले तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या बैंक खात्यावर अनुदान जमा झालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सद्यस्थिती जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे फळ पिकासह अन्य पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. तरी ऑक्टोबर २०२० या कालावधीत अवकाळी पडलेल्या पावसामुळे झालेल्या भातशेतीच्या नुकसानी साठीचे कणकवली तालुक्यासाठी १ कोटी २४ लाख ५७ हजार ८०० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात तात्काळ जमा करण्यात यावेत. अशी मागणी जयप्रकाश पारकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय भडकवाड यांच्याकडे सादर केले.

You cannot copy content of this page