जिल्ह्यात माकडतापाचे सापडले दोन रुग्ण

आरोग्य यंत्रणा अलर्ट

सिंधुदुर्गनगरी ता २० सिंधुदुर्ग जिल्ह्यात मार्च अखेर (के एफ डी) माकडतापाचे २ रूग्ण सापडले आहेत. तर १५ ठिकाणी के एफ डी संक्रमित गोचिड सापडल्या आहेत. त्यामुळे हिवताप विभाग सतर्क झाला असून खबरदारीच्या उपाय योजना संबंधित गावामध्ये सुरु केल्या असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.रमेश कर्तस्कर यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी पासून आंबा, काजू या पिकांचा हंगाम सुरु होतो. या कालावधीत दरवर्षी माकड़ तापाचे रूग्ण सापडतात.सद्यस्थितित जिल्ह्यात माकड़तापाचे दोन रूग्ण सापडले आहेत. याबाबत उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील २३ ठिकाणी राबविण्यात आलेल्या गोचिड कलेक्शन महिमेत १५ ठिकाणी (के एफ डी) माकड़ताप संक्रमित गोचिड सापडल्या आहेत.असा अहवाल प्राप्त झाला आहे. अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी रमेश कर्तस्कर यांनी आज दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या काजू ,आंबा पिकाचा हंगाम सुरु झाला आहे. या कालवधीत दरवर्षी माकड तापाची साथ उदभवते. या साथीची शक्यता लक्षात घेता जिल्हा हिवताप विभागाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. माकडतापाची साथ उदभवण्याची शक्यता असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील बांदा, मोरगांव, तळकट, सटेली-भेडसी या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गांवामध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात (डी एम पी )ऑइल, तसेच म्यलेथॉन पावडरचा मुबलक पुरवठा करण्यात आला आहे. तर प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये ऑईल व म्यलिथॉन पावडरचा साठा उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात माकड तापाच्या साथीला सुरुवात झाली आहे. मार्च अखेर २ रूग्ण सापडले आहेत. मात्र ही साथ पसरु नये. यासाठी उपाययोजना करतानाच रुग्णाचा शोध घेण्यासाठी सर्वे सुरु करण्यात आला आहे. तर संशयित रुग्णाचे सीरम सैम्पल दर गुरुवारी तपसणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात येतात .मात्र आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या सशयित ११४ रुग्णांच्या नमून्यामध्ये २ नमूने के एफ डी पॉझिटिव सापडले आहेत. यामध्ये भेडशी ( पिकुळे),व उसप या गावांचा समावेश आहे.

गोचिड कलेक्शन मोहीम जिल्ह्यात १ मार्च पासून गोचिड कलेक्शन मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आतापर्यन्त २३ गांवामध्ये केलेल्या गोचिड कलेक्शन मध्ये १५ ठिकाणी (के एफ डी ) संक्रमित गोचिड सापडली आहे. ही मोहीम मळगांव , निरवडे,बांदा,चराठा, ओटवणे,भिरवंडे, डीगवळे,फणसगांव फोंडा ,सांगेली ,केरगाव,मोर्ले,नेरूर,गिरगाव, मांणगांव ,वाडोस,वर्दे, बिड़वाडी, वेर्ले, घोड़गेवाडी, कुंनकवन, या गावात राबउन गोचिड कलेक्शन करण्यात आले त्यापैकी दोडामार्ग तालुक्यात २, कणकवली ४, कुडाळ ३, सावंतवाड़ी ५, देवगड़ तालुक्यात १ अश्या १५ ठिकाणी माकड़ताप संक्रमित गोचिड मिळाली असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमेश कर्तस्कर यांनी आज दिली. * माकडताप जिल्ह्यात पसरु लागला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात दोडामार्ग आणि सावंतवाड़ी या दोन तालुक्यातील गावांमध्ये माकड़तापाचे रूग्ण सापडत होते. मात्र आता गोचिड कलेक्शन मोहिमेत जिल्ह्यातील एकुण ८ पैकी ५ तालुक्यातील १५ गावामध्ये के एफ डी संक्रमित गोचिड सापडल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

त्यामुळे आता ही साथ केवळ दोडामार्ग व सावंतवाड़ी तालुक्यापुरती मर्यादित न रहता ती सम्पूर्ण जिल्ह्यात पाय पसरु लागली असल्याचे दिसून येत आहे. तरी जिल्हावासीयानी याची खबरदारी घेण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूच्या हंगामात माकड़ तापाची साथ उद्भवते. हे लक्षात घेता माकड़तापाची साथ येऊ नये. यासाठी हिवताप विभाग सतर्क झाला असला तरी प्रत्येक नागरिकांनी माकडतापाबाबत ख़बरदारी घेतली पाहिजे. काजू बागेत किवा जंगल भागात जाताना आरोग्ययंत्रने कडून दिलेल्या सूचनाचे पालन करावे. तसेच साथरोग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमेश कर्तस्कर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page