विशाल परब:राजकीय पक्षातील नेत्याला आपला शत्रू मानले नाही आणि पुढेही मानणार नाही…
सावंतवाडी, ता. १५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनानुसार सेवा उपक्रम राबविताना जनतेशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. गेल्या आठ दिवसांत मतदारसंघातील विविध भागांचा दौरा करताना गोरगरीब जनता, आजी-आजोबा आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे आशीर्वाद मिळाले. त्यांच्या प्रेमातून आणि विश्वासातून मिळणारे समाधान कोणत्याही प्रसिद्धीपेक्षा मोठे आहे, असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी केले.
परब म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात २००७ पासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या मतदारसंघातील १६४ गावांमध्ये जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. कोणताही उपक्रम केवळ प्रसिद्धीसाठी करण्याचा आमचा उद्देश नाही. जनतेच्या मनात स्थान निर्माण होणे हीच खरी कमाई आहे.’’ ‘‘सिंधुदुर्गच्या राजकारणात काम करताना कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्याला आपला शत्रू मानले नाही आणि पुढेही मानणार नाही. विरोधकांनी टीका केली तरी त्याला उत्तर देण्यापेक्षा त्यांना परमेश्वराने चांगली बुद्धी द्यावी आणि त्यांच्याकडून चांगले काम घडावे, अशीच माझी भावना आहे,’’ असेही परब यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी भाजपचे महाराष्ट्र सहप्रभारी सदानंद शेट तानवडे यांच्याशी झालेल्या मैत्रीचा प्रसंग सांगितला. दिल्लीतील एका भेटीत तानवडे यांची प्रथम भेट झाली. सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता आपल्या मेहनतीच्या जोरावर खासदार होऊ शकतो, याचा अभिमान वाटतो, असे सांगत त्यांनी तानवडे यांच्या कार्याचा गौरव केला. दरम्यान, सावंतवाडी नगरपरिषद भाजपच्या ताब्यात कायम राहावी यासाठी सर्व नगरसेवक व पदाधिकारी एकजुटीने प्रयत्न करणार असल्याचेही परब यांनी सांगितले. जनतेच्या प्रश्नांसाठी दर मंगळवारी ‘ओपीडी’ जनतेच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी विशेष संकल्पना राबविण्यात येणार असल्याची घोषणा विशाल परब यांनी यावेळी केली. नागरिकांना आपल्या समस्या मांडता याव्यात यासाठी क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या प्रश्नांवर कार्यवाही केली जाणार असून, येत्या काळात दर मंगळवारी जनसंपर्क शिबिरानंतर कायमस्वरूपी ‘ओपीडी’ स्वरूपाची व्यवस्था सुरू करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्याचा हा उपक्रम असल्याचे परब यांनी सांगितले.”

