Headlines

“‘सेवा हीच संघटनेची खरी ताकद’…

सदानंद शेठ तानावडे: “विशाल परब यांच्या उपक्रमांचे तानावडेंकडून कौतुक..

⚡सावंतवाडी, ता. १५-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सेवा हीच संघटनेची ताकद’ या भावनेतून भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी वाढदिवसाचा उत्सव न करता विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजाप्रती बांधिलकी जपली आहे. महाआरोग्य शिबिरासह गरजू, विद्यार्थी, दिव्यांग, महिला व शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भाजप महाराष्ट्र सहप्रभारी तथा गोवा माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले. सावंतवाडी येथे विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, सिद्धार्थ भामबोरे, मनोज नाईक, बाळू देसाई, राजेंद्र कोरगावकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

तानावडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी वाढदिवस साधेपणाने व सेवा उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा आदर्श घालून दिला आहे. त्याच धर्तीवर विशाल परब यांनीही वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांना न करता आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. गेल्या काही दिवसांत मळेवाड, वेंगुर्ला, दोडामार्ग, तुळस आदी भागांत आरोग्य शिबिरे घेण्यात आली असून, सावंतवाडीतील महाआरोग्य शिबिर हा त्याच उपक्रमाचा पुढील टप्पा आहे. या शिबिरामध्ये विविध नामांकित रुग्णालयांतील डॉक्टर सहभागी झाले असून नागरिकांची तपासणी, औषधोपचार तसेच आवश्यक शस्त्रक्रियांसाठी मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिबिरानंतरही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नयेत, यासाठी दर आठवड्याला विशाल परब यांच्या कार्यालयात डॉक्टर उपलब्ध राहणार असल्याचे तानावडे यांनी सांगितले. ‘सेवा उपक्रम केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित नसावा’ सामाजिक कार्य हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता सातत्याने सुरू ठेवणे आवश्यक आहे. आरोग्य शिबिरे, रक्तदान, दिव्यांगांना मदत, विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, महिलांना प्रोत्साहन तसेच दुष्काळग्रस्त भागात पाणी अडविण्यासाठी बंधारे उभारण्यासारख्या उपक्रमांतून भाजप कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन तानावडे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेत युवा, महिला, शेतकरी आणि गरीब घटकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या योजना पोहोचविणे हे अंत्योदयाचे उद्दिष्ट असून, या कार्यात प्रत्येक कार्यकर्त्याने योगदान देण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशाल परब यांनी वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केल्याबद्दलही तानावडे यांनी त्यांचे कौतुक केले. समाजासाठी विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे हीदेखील सामाजिक बांधिलकीच असल्याचे त्यांनी सांगितले. विशाल परब यांच्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी चांगले संस्कार केले असून, त्यातूनच समाजसेवेची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गसह गोवा परिसरातील विविध घटकांशी आपुलकीचे संबंध ठेवत सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे, असेही तानावडे म्हणाले. यावेळी त्यांनी विशाल परब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत उत्तम आरोग्य, यश आणि भविष्यातही लोकसेवा व देशसेवेचे कार्य सातत्याने सुरू राहावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.”

You cannot copy content of this page