जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमेश कर्तस्कर यांची माहिती
सिंधुदुर्गनगरी ता २१ सिंधुदुर्ग जिल्हा हिवताप विभागामार्फत १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत जागतिक हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात येत असून या कालावधीत जिल्ह्यात किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर यांनी आज दिली.
पावसाळा सुरू झाला की, किटकजन्य आजार पसरू लागतात. त्यामुळे जागतिक हिवताप दिनाच्या औचित्य साधून १ एप्रिल ते ३० एप्रिल हा महिना हिवताप प्रतिरोध (जनजागृती) महिना साजरा करण्यात येत आहे. लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. या कालावधीत हिवताप, डेंग्यू ,चिकुनगुनिया, हत्तीरोग असे कीटकजन्य आजार पसरण्याची शक्यता असते. यासाठी जिल्हा हिवताप विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. किटकजन्य आजाराबाबत आणि उपाययोजनांबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी. यासाठी जिल्ह्यात जनजागृती केली जात आहे. विविध ठिकाणी शाळा, कॉलेज, आरोग्य केंद्र, सार्वजनिक गर्दीची ठिकाणे, अशा ठिकाणी डासांपासून उद्भवणाऱ्या आजारांबाबत व त्यावरील उपाययोजना बाबत कर्मचाऱ्यांन मार्फत जनजागृती केली जात आहे. तसेच डास निर्मूलनासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना केल्या जात आहेत. अशी माहिती डॉ. रमेश कर्तस्कर यांनी आज दिली.
जिल्ह्यात १९७ गप्पी मासे पैदास केंद्रे कार्यरत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९७ ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्रे कार्यरत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गप्पी माशांची पैदास केली जाते. गप्पी माशां पासून डासाची अळी नष्ट करून डांसउत्पत्ती रोखता येते. त्यासाठी ज्या ठिकाणी डास अंडी घालतात अशा पाण्याच्या डपक्यामध्ये, गटारांमध्ये, गप्पी मासे सोडले जातात. याचा डांसउत्पत्ती रोखण्यास फायदा होतो.
