मालवण ता.२१-:* मालवण बाजारपेठ येथील कोल्ड्रिंक्स दुकानात महत्वाची कागदपत्र व रोख रक्कम यांचा समावेश असलेली पिशवी चौके येथील साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैभवी चौकेकर यांना सापडल्यावर त्यांनी ती पिशवी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्यास परत करून प्रामाणिकपणा दाखविला आहे.
सौ. वैभवी चौकेकर यांना मालवण मधील राणे कोल्ड्रिंक्स हाऊस येथे एक व्यक्ती विसरून गेलेली पिशवी सापडली. पिशवी उघडून पाहिली असता एटीएम, ई-श्रम कार्ड, इतर महत्वाची कागदपत्रे व रोख १३०० रुपये असलेली पर्स तसेच इतर सामान दिसून आले. सौ. चौकेकर यांनी मालवण मधील ब्युटीपार्लर व्यावसायिका सौ. सायली मांजरेकर यांच्या मदतीने कागदपत्रांवरील मोबाईल क्रमाकांवर संपर्क साधला असता सदर पिशवी हडी येथील महान चव्हाण यांची असल्याचे स्पष्ट झाले. पिशवीतील कागदपत्रे, रक्कम व साहित्याची खातरजमा केल्यानंतर सौ. चौकेकर यांनी ही पिशवी चव्हाण यांच्या स्वाधीन केली. सौ. वैभवी चौकेकर यांच्या सतर्कता व प्रामाणिकपणाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
