देवधर प्रकल्प बधितांचे १ मे रोजी आमरण उपोषण

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडणार आंदोलन;एकनाथ परब यांचा इशारा

सिंधुदुर्गनगरी ता १८ देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पात बाधित होऊन बेघर झालेल्या नागरिकांना २० वर्षे झाली तरी शासनाकडून भूखंड मिळत नसल्याने तसेच वारंवार प्रशासनाकडून फसवणूक होत असल्याने याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा एकनाथ परब यांच्यासह घोंणसरी प्रकल्पातील वंचित प्रकल्पग्रस्तांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

कणकवली तालुक्यातील घोणसरी येथील एकनाथ परब, यांच्यासह अन्य २४ नागरिकांची घरे देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पात बाधित झाली आहेत. शेतीही बुडीत क्षेत्रात गेल्याने हे सर्व नागरिक बेघर झाले आहेत. या नागरिकांची जमीन प्रकल्पासाठी शासनाने संपादित केल्याने आपल्याला दुसरीकडे निवासी भूखंड मिळावा अशी मागणी या प्रकल्पग्रस्तांनी शासनाकडे केली आहे. मात्र त्यांना निवासी भूखंड देण्याचा प्रस्ताव गेली २० वर्षे शासनाकडे प्रलंबित आहे. याविरोधात या प्रकल्पग्रस्तांनी अनेक वेळा शासनाचे आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने केली.

यावेळी या प्रकल्पग्रस्तांना प्रशासनाकडून केवळ आश्वासने देण्यात आली २६ जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण केले असता पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा खात्याचे अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांची उपोषण स्थळी भेट घेतली होती. यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांसमवेत बैठक घेऊन सदरचा प्रस्ताव मार्गी लावून प्रकल्पग्रस्तांना निवासी भूखंडाचे वाटप करावे. असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यानी प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

आता शासनाच्या आणि प्रशासनाच्या आश्वासनांवर विश्वास नसल्याने आपल्याला शासनाकडून निवासी भूखंड मिळत नाही आणि आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन करावे लागेल.असा पवित्रा प्रकल्पग्रस्तनी घेतला असून येत्या १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच देवधर पाटबंधारे प्रकल्प घोंणसरी येथे आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा जिहाधिकारी याना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

You cannot copy content of this page