करूळ घाटाच्या डागडुजीच्या दर्जा बाबत तडजोड खपवून घेणार नाही

आम राणे यांनी दिला खणखणीत इशारा

वैभववाडी प्रतिनिधी करुळ घाट हा रहदारीच्या दृष्टीने कोकण व घाटमाथा यांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. घाटात सुरू असलेल्या डागडुजी कामाच्या दर्जाबाबत तडजोड अजिबात खपवून घेणार नाही. असा सज्जड दम आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला.

करूळ घाट कामाबाबतचा आढावा येथील तहसील कार्यालयात आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी तहसीलदार श्रीमती कासकर, पोलिस निरीक्षक अतुल जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती भालचंद्र साठे, माजी सभापती अरविंद रावराणे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, माजी सभापती अक्षता डाफळे, प्राची तावडे, रितेश सुतार, उपनगराध्यक्ष संजय सावंत, नगरसेवक राजन तांबे, संतोष महाडिक, पिंट्या रावराणे, सुनील भोगले, प्रकाश सावंत, उपकार्यकारी अभियंता श्री. शिवनीवार, कनिष्ठ अभियंता श्री सुतार व पदाधिकारी उपस्थित होते.

मतदारसंघात करूळ व भुईबावडा हे दोन प्रमुख घाट आहेत अनेक वर्ष आपण घाट मार्गाची पाहणी करत आहोत. घाट सुस्थितीत राहावे यासाठी आमचे कायम प्रयत्न राहीले आहेत. त्यामुळे घाट मार्गातील कामांकडे दुर्लक्ष केल्यास गय करणार नाही. करूळ घाटातील काम दर्जेदार झाले पाहिजे. कामाबाबत अनेक जणांच्या तक्रारी आहेत. सदर कामाची क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी व्हावी अशी अनेक जण मागणी करत आहेत. त्याबाबत कार्यवाही करा. अशा सूचना आ. राणे यांनी दिल्या.

चौकट पालकमंत्री उदय सामंत यांनी करुळ घाट बंदची घोषणा भविष्यात केली तर आम्ही काय करायचे. मागील पावसाळ्यात भुईबावडा घाट खचला होता. खचलेल्या मार्गाची पाहणी पालकमंत्री यांनी केली नाही. तरीही पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजनच्या आढावा बैठकीत सदर घाट सहा महिने बंद राहील अशी घोषणा केली. परंतु सहा महिने होऊन देखील घाट दुरुस्तीबाबत कोणतीही कार्यवाही त्यांनी केली नाही. सद्यस्थितीत करुळ घाटाचे काम सुरू आहे. हे काम निकृष्ट झाले आणि घाट मार्ग खचला तर पालकमंत्री घाट बंदची घोषणा करतील. मग आम्ही करायचे काय ? असा उपहासात्मक टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला. फोटो : वैभववाडी येथे आढावा बैठकीत बोलताना आमदार नितेश राणे. छाया संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page